सामाजिक बांधिलकी जनसेवेची – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे सदर

मन वढाय वढाय… दैनिक मराठवाडा नेता मध्ये प्रकाशित होणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे सदर !!

* सामाजिक बांधिलकी जनसेवेची*

1995 सालचे थंडीचे दिवस. नांदेड नगरपालिकेतर्फे गंधर्व नगरी मध्ये प्रवाशी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदीच्या कविसंमेलनाला तुफान गर्दी असायची. देशातील एक नामवंत कवी पूर्वीच्या कविता म्हणत होता. मध्यंतरात त्याला जाऊन भेटलो आणि म्हणालो.” आप जो कविता बोल रहे हो.वो हमने कई बार सुनी है. कुछ नया सुनाइये.” त्यावर त्या महाशयांनी मला असे काही सुनावले की, मी चकित झालो.” इस कविसंमेलन के जो आयोजक है उन्होने अगर कहा तोही मैन नई कविता पढुंगा, जिस दिन तुम खुद कविसंमेलन का आयोजन करेंगे तब अपनी फर्माईश बताना बेटा.” कवी संमेलन घेण्याची माझी काही ऐपत नसल्यामुळे मी काही बोललो नाही. पण मनोमन निश्चय केला की, एक ना एक दिवस मला कवीसंमेलन घेऊनच दाखवायचे.

चार वर्षांनी तो एक जुळून आला. माझे मित्र असणारे नांदेड चे लोकप्रिय आमदार प्रकाशभाऊ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कवी संमेलनाचे आयोजन केले. सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. मी मुद्दामहून त्या कवीला आमंत्रित केले. हजारो रसिकांच्या उपस्थितीत कविसंमेलन रंगात आले असताना त्या कवींचा काव्य पठणासाठी नंबर आला. त्यांनी आपली ती नेहमीच कविता म्हणायला सुरुवात केली. मी त्यांना थांबवले आणि मागच्या किस्साची आठवण करून दिली. या कविसंमेलनाच्या मी आयोजक असल्यामुळे नवीन कविता म्हणावी असे सांगितले. त्या कवीने माझी पाठ थोपटली आणि सांगितले “बेटा, एक दिन तुम बहुत आगे बढोगे. तुम्हारे जीद को मानना पडेगा.” तेव्हापासून आजतागायत दरवर्षी अखिल भारतीय स्तरावरचे कविसंमेलन घेऊन नांदेडच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्यात येते. देशातील सर्वच नामवंत कवींनी नांदेडच्या या कविसंमेलनात 21 वर्षात हजेरी लावली आहे.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने वेगवेगळे सामाजिक उपक्रम नांदेडमध्ये आम्ही राबवत असतो. शासकीय विद्यानिकेतन या माझ्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यावर भर दिल्यामुळे सर्व क्षेत्राची आवड निर्माण झालेली आहे. वर्तमानपत्रात एखाद्या उपक्रमाची बातमी वाचली अथवा टीव्हीवर पाहिली आपण देखील नांदेडला हा उपक्रम सुरु करावा असे वाटते आणि तसा प्रयत्न करतो. एस टी मध्ये नोकरी करत असताना 1985 साली शिवजयंती व गणेशोत्सवाचा अध्यक्ष होतो त्यावेळी शिल्लक राहिलेल्या रकमेतून आम्ही अन्नदान केले होते. हा माझा पहिला उपक्रम होता. त्यानंतर आजपर्यंत विविध मार्गाने अन्नदान करण्यात येत आहे.वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून रुग्णांना फळेवाटप करण्यात येतात.

आतापर्यंत 54 रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात मला यश आले आहे. याद्वारे 4628 रक्ताच्या बाटल्यांची संकलन करण्यात आले. दुसर्‍यांकडून रक्त संकलन करत असताना मी स्वतः 37 वेळा रक्तदान केलेले आहे. मुंबई बॉम्ब हल्ल्याची बातमी टीव्ही मध्ये पाहिल्यानंतर आपण काय करू शकतो हा विचार माझ्या मनात आला. तेव्हा काही सोशल मीडिया नसल्यामुळे रातोरात मी त्यांना शक्य होईल तितक यांना फोन करून दुसऱ्या दिवशी सकाळी महा रक्तदान शिबिर घेतले. 342 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन रक्तदान केले. हे सर्व रक्त एयर अंबुलन्स द्वारे द्वारे मुंबईला पाठवण्यात आले.

नांदेड शहरालगत असलेल्या सत्य गणपती या देवस्थानाला दर महिन्याच्या चतुर्थीला पायी वारी करण्यात येते. उन असो, पाऊस असो अथवा कडाक्याची थंडी सत्य गणपती पदयात्रा कधीही चुकली नाही. तेरा किलोमीटर या पदयात्रेचे आतापर्यंत 151 पदयात्रा पूर्ण झालेल्या आहेत. आमच्या पदयात्रेत एकदा माणूस आला की त्याला पायी चालण्याची आवड निर्माण होते. त्यामुळे आपोआपच शारीरिक तंदुरुस्ती राखल्या जाते. यासोबतच दत्त जयंतीला नांदेड ते माहूर पदयात्रा आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी नांदेड ते औंढा नागनाथ पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी होतात.

अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही असा इशारा 2001 साली दिला होता. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रा नाहीतर हज यात्रेला मुंबईतून कोणालाही जाऊ दिले जाणार नाही असा इशारा देऊन जास्तीत जास्त हिंदुंनी अमरनाथ यात्रा करावी असे आवाहन दिले. तेव्हापासून सलग अठरा वर्ष शेकडो भाविकांना घेऊन अमरनाथ यात्रेचे नियोजन करत असतो. यावर्षी कोरोनामुळे सलग 19 वेळेस अमरनाथ यात्रा करण्याचा विक्रम करता आला नाही. याशिवाय गंगासागर यात्रा, नेपाळ यात्रा, रामेश्वर कन्याकुमारी यात्रा, बद्रिकेदार यात्रा, द्वारका सोमनाथ यात्रा यासारख्या धार्मिक स्थळांना दरवर्षी भेट देण्यात येते. ना नफा ना तोटा या धर्तीवर या यात्रा यशस्वी होत आहेत.

हरिद्वार वाराणसी प्रमाणे पंधरा वर्षापासून चालत असलेला नांदेड येथील गोदावरी गंगा पूजनाचा कार्यक्रम देखील महिलांमध्ये लोकप्रिय झाला आहे. शेकडो महिला हजारो दिव्यांनी गोदावरीची आरती करण्याचे नयनमनोहर दृश्य टीपण्यासाठी नांदेडकर मोठ्याप्रमाणात गर्दी करतात. याशिवाय नांदेड मधील मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

धार्मिक कार्यक्रमास सोबतच क्रीडा क्षेत्रात देखील वेगवेगळ्या स्पर्धांचे 21 वर्षापासून आयोजन करण्यात येते. त्यामध्ये एन्जॉय स्विमिंग कॉम्पिटिशन, चालण्याच्या भव्य स्पर्धा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सायकल स्पर्धा घेण्यात येतात. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सर्व सामने मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्यात येतात. विश्वचषक जिंकल्यानंतर मिरवणुका देखील काढण्यात आलेल्या आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे पाणपोई लावण्यात येते. एका वर्षी आमच्या पाणपोईचे रांजण कोणीतरी दररोज फोडायचे. दुसऱ्यादिवशी मी नवीन रांजण आणून ठेवायचो. असे तब्बल सात दिवस झाले. शेवटी कंटाळून मी तिथे लिहून लावले की, कितीही रांजण फोडले तरी मी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत नवीन रांजण आणून ठेवेण. पण जर प्रकरण हाताबाहेर गेले तर पाणपोई बंद करावी लागेल आणि त्यामुळे याचा उपयोग घेणाऱ्या नागरिकांचे शिव्याशाप मिळतील त्याचा तरी विचार करा. आणि चमत्कार झाला त्यानंतर एकदाही आमचे रांजण आत्तापर्यंत फुटले नाही. आमच्या घरासमोर कायम एक छोटा हौद प्राण्यांच्या पिण्यासाठी भरलेला असतो. घरावर पक्ष्यांसाठी स्टँड लावला असून त्यावर वाट्या मध्ये पाणी आणि प्लेटा मध्ये दाणे अथवा शिल्लक असलेला भात आठवणीने ठेवतो.

रत्नेश्वरी गडावर पाऊस दिंडी घेऊन गेल्यानंतर आम्ही सर्वजण दरवर्षी जमा केलेल्या बियाचे रोपण करतो. सिडबॉलचा प्रयोग करतो. विविध प्रसंगी वृक्षारोपण करणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे. दरवर्षी किमान तीन-चार वेळा तरी स्वच्छता मोहीम आखली जाते. या सर्व प्रकारातून निसर्गाचे संवर्धन करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो.

नांदेड भूषण पुरस्काराचे वितरण, नरेंद्र महोत्सव, देवेंद्र फेस्टिवल, सुधाकर पत्र भूषण पुरस्कार, ज्या विद्यानिकेतन मध्ये मी शिकलो तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, कोजागिरी महोत्सव, होळीचे महामूर्ख कवी संमेलन, व्याख्यान माला, बहना भाग मत जाना हे युवती संस्कार शिबिर, भव्य रांगोळी स्पर्धा, ओठावरची गाणी, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, निबंध स्पर्धा ,वादविवाद स्पर्धा, भव्य बदकम्मा स्पर्धा, देवीचे जागरण, हास्य योगा शिबिर यासारखे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 74 उपक्रम दरवर्षी घेण्यात येतात. नुसते एकदा घेतले जात नाहीत तर त्यात सातत्य ठेवल्या जाते.

आमच्या उपक्रमांपैकी एक उपक्रम बंद झाला त्याचा मला आनंद आहे. तो म्हणजे पूर्वी आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी च्या दुसऱ्या दिवशी
रस्त्यात पडलेले प्लास्टिकचे तिरंगी ध्वज जमा करून महापालिकेकडे सन्मानाने द्यायचो. आता प्लास्टिक बंदी झालेली आहे लोकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे एकही ध्वज रस्त्यावर पडलेला आढळून येत नाही याचा मला अभिमान आहे.

या सर्व उपक्रमासाठी अनेक दानशूर नागरिकांनी मला भरभरून मदत केलेली आहे. कधी कधी वाटते की, जर माझ्याकडे एखादे महत्त्वाचे पद अथवा प्रचंड पैसे आले तर जगातील असा एकही उपक्रम राबविल्या शिवाय राहणार नाही. गेले पस्तीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नागरिकांनी भरभरून कौतुक केले.”धर्मभूषण” ही उपाधी, आदर्श शिवसैनिक पुरस्कार,राजपूत भूषण पुरस्कार,माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार,राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार ,मातोश्री गंगूताई पुरस्कार,जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, शान ए नांदेड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार,मराठवाडा भूषण पुरस्कार,
लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड देऊन देशभरातील विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळातील केलेल्या कामाची दखल घेऊन सतरा संस्थांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन कौतुकाची थाप मारली आहे. विशेष म्हणजे यातील पाच संस्था मुंबईच्या असून त्यांना मी ओळखत सुद्धा नाही.

आता एकच इच्छा आहे की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी.

*मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर*

*लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया*

ताज्या बातम्या