विक्रांत वार्डे शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते यांच्या आरोपाला अ‍ॅडव्होकेट मनोज पाटील, युवासेना अधिकारी यांचे चोख प्रत्युत्तर !

[ अलिबाग प्रतिनिधी.- अभिप्राव पाटील. ]
शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष श्री. विक्रांत वार्डे यांनी अलिबाग-मुरुड तालुक्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान, दमदार तथा कार्यक्षम आमदार श्री. महेंद्र शेठ दळवी यांच्यावर केलेल्या बिनबुडाच्या खोट्या आरोपांना अ‍ॅडव्होकेट श्री. मनोज पाटील, युवासेना अधिकारी यांनी चोख आणि खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. अ‍ॅड. श्री. मनोज पाटील म्हणाले, ”सर्वात आधी विक्रांत वार्डे यांनी आधी शेतकरी कामगार पक्षाने रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न केले याचा मागील 25 वर्षांचा इतिहास पहावा.
अलिबाग तालुक्यात येणारा एअरपोर्ट कोणी घालवला? रिलायन्स सेजला विरोध कोणी केला? टाटा पॉवर प्रोजेक्टसाठी कोणी आंदोलने केली? पटणी कंपनीला विरोध कोणी केला? सूर्या कंपनीला विरोध कोणी केला? विरोध करण्याची नक्की कारणे काय होती? विरोध खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केला का? सूर्या कंपनी कोणी घालवली? एनटीओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोणी घालवली? स्वील इंडिया कंपनी कोणी घालवली? याचा सखोल अभ्यास आधी विक्रांत वार्डे यांनी करावा.
आमच्या आमदाराने प्रत्येक युवकाला रोजगार देण्यासाठी प्रयत्न करून असंख्य युवकांना येथील स्थानिक व इतर कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरीलासुद्धा लावले आहे. आरसीएफसारख्या केंद्र सरकारच्या कंपनीला त्या काळी शेतकरी कामगार पक्षानेच कडाडून विरोध केला होता हा इतिहास जगजाहीर आहे.
तत्कालीन मा. मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब यांच्या प्रयत्नांमुळे आरसीएफ कंपनी अलिबागमध्ये येऊ शकली, हे त्रिवार सत्य आहे. खरं पहाता, आरसीएफ कंपनी थळ परिसरात आल्यामुळे थळ येथील तत्कालीन युवकांना तात्काळ नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे सदर परिसराचा विकास होऊन आर्थिक भरभराट झाली हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे विद्यमान आमदार मा. श्री. महेंद्र दळवी यांच्या सक्षम कार्यक्षमतेवर बोट उगारण्यापेक्षा आधी आपल्या पक्षाचे धोरण तपासून पहा.” या शब्दांत अ‍ॅड. श्री. मनोज पाटील यांनी श्री. विक्रांत वार्डे यांचीच कानउघडणी केली आहे.
अ‍ॅड. श्री. मनोज पाटील पुढे म्हणाले, “शेतकरी कामगार पक्षाच्या नाकर्तेपणामुळे गोरगरीब शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन नापीक झाली याला जबाबदार कोण? अलिबाग-मुरुड तालुक्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर लॉकडाऊनच्या खडतर काळातदेखील मा. आमदार श्री. दळवी यांच्याकडून अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आले. मात्र शेतकरी कामगार पक्षाने या काळात तरुणांची साधी दखलसुद्धा घेतली नाही. या काळात तुम्ही नक्की काय केलंत? याचा लेखाजोखा आधी जनतेला द्यावा. रोहा एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी, जेएसडब्ल्यू कंपनी, खोपोली एमआयडीसी, खालापूर अशा अनेक औद्योगिक क्षेत्रात व कंपन्यांत आ. दळवी यांनी तरुणांना नोकरीस लावले. आणि म्हणूनच आज इथला प्रत्येक स्थानिक तरुण आमदार श्री. महेंद्र दळवी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
आज येथील प्रत्येक तरुणांना न्याय देण्यासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव नेता आमदार महेंद्र शेठ दळवी हेच आहेत असा ठाम विश्वास येथील तरुणांमध्ये आहे. शेवटी एवढेच म्हणेन, “हाती चले शान से कुत्ते भोके हजार” हेच खरे! तेव्हा मा. आ. दळवी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उगारण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या अपयशाची कारणे पडताळून पहाणे.” या तिखट शब्दांत श्री. वार्डे यांच्या खोट्या आरोपांना अ‍ॅड. श्री. मनोज पाटील, युवासेना अधिकारी यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या