अलिबाग विभागात महावितरण वीज यंत्रणेच्या देखभाल,दुरुस्तीसाठी ‘एक गाव-एक दिवस’ उपक्रम !

● कार्यक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद.

(ठाणे प्रतिनिधी- सुशिल मोहिते)
महावितरण ग्राहकांच्या सोयीसाठी तसेच त्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी व त्यांना येत असलेल्या विजे संबंधी अडचणी जाणून घेण्यासाठी,मा.ऊर्जामंत्री डॉ.श्री.नितीन राऊत यांनी ‘एक गाव -एक दिवस’ हे विशेष उपक्रम राबविण्याचे निर्देश महावितरणच्या सर्व कार्यालयांना दिले होते.

त्याप्रमाणे,महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत अलिबाग येथील वडगाव गावात ‘एक गाव एक दिवस’ उपक्रम दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री.सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

यावेळी,पेण मंडळांचे अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील व अलिबाग वडगावच्या सरपंच सौ.सरिता भगत व सदस्य श्री.जयेंद्र भगत उपस्तीथित होते.

या अभियानांतर्गत,वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे उदा. लोंबकळणाऱ्या तारा,गंजलेले डीपी दुरुस्त करणे अशा कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या समस्यांचे निराकरण करून विजे संबंधी विविध प्रश्न मार्गी लावणार आहेत. सदर उपक्रमात, एकाच दिवसात अलिबाग विभागात वडगाव येथे ग्राहकांना योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यासाठी, १८ पोलची वायरिंग सिंगल फेजमधून ३ फेज मध्ये करण्यात आली. याशिवाय, ६ खराब व गंजलेल्या डीपी बदलून नवीन डीपी बसवण्यात आले. तर १०० केव्हीचे ट्रान्सफॉर्मर बदलून २०० केव्हीचे नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्यात आले आहेत.

या कार्यक्रमात मा. मुख्य अभियंता भांडूप परिमंडल श्री. सुरेश गणेशकर यांनी कृषी धोरण २०२० बाबत सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पेण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील यांनी सुद्धा कृषी धोरण २०२० बाबत माहिती दिली. या अभियानांतर्गत अलिबागचे कार्यकारी अभियंता श्री. कुंदन भिसे, वडगाव या गावाला दत्तक घेऊन या गावातील सर्व वीज संबंधी समस्यांचे निराकरण करतील. तसेच ग्राहकांच्या सर्व विजेबाबत तक्रारी शून्यावर आणण्याची खात्री करतील. याशिवाय, वीजदेयकाची थकबाकी वसुली करण्यावर सुद्धा भर देणार आहेत.

१० फेब्रुवारी ला वडगाव येथे राबविण्यात आलेल्या या ‘एक गाव एक दिवस उपक्रमात 16 कृषीपंप ग्राहकाकडून तब्बल रु.42,000, पाणीपुरवठा योजनेतील ग्राहकाकडून रु.37, 500 तसेच 22 घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांकडून 44, 500 असे एकूण 1 लाख 24 हजार रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आली. या कार्यक्रमात कृषी थकबाकी भरणाऱ्या काही ग्राहकांचे सत्कार मा.मुख्य अभियंता श्री.सुरेश गणेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उपक्रमात, अति. कार्यकारी अभियंते श्री. राख, श्री. सादिक इनामदार तसेच शाखा अभियंते श्री. जितेंद्र पाटील, श्री.विक्रम जगताप, श्री. सपकाळे यांनी विशेष कामगिरी केली. यावेळी महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता म्हणाले कि, ” महावितरणला ग्राहकाभिमुख बनविणे हा या उपक्रमाचा महत्वाचा उद्धिष्ट आहे. या योजनेमार्फत, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रत्येक गावामध्ये जाऊन देखभाल व दुरुस्तीची कामे करणार, जेणेकरून ग्राहकांमध्ये महावितरण प्रति आपुलकीची भावना निर्माण होईल.

या योजनेमार्फत, ग्राहकांना 24/7 ग्राहक सेवा व अखंडित वीजपुरवठा देण्याचे लक्ष्य महावितरण समोर आहे. याशिवाय, वीज देयकात दुरुस्ती करणे तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. यामध्ये, एकूण कृषी ग्राहकांचा वसुलीपैकी 33% त्या ग्रामपंचायतीच्या वीज वितरण यंत्रणेचा देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च होणार आहे “.

ताज्या बातम्या