गुप्तधन लालसेपोटी पिंडीखालीच खोदकाम करणाऱ्या तिघांना २४ तासात अटक.

■ पोलिस अधीक्षककांकडून कुंटूर पोलिसांचे कौतुक..

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
गुप्तधनाच्या लालसेपोटी महादेव मंदिरातील चक्क पिंड बाजूला सारून त्या पिंडी खालीच खड्डा खोदल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी कुंटूर पोलिसांनी आता तिघांना अटक केली आहे.
नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर औद्योगिक वसाहतीत फ्लेमिंगो मेडिसिन कंपनीच्या बाजूला असलेल्या कमठेवाड यांच्या शेतात फुल माळ्याच्या महादेवाच्या पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरात मंगळवारी गुप्तधनाच्या लालसेपोटी मंदिरातील महादेवाची पिंड बाजूला काढून त्याखाली खड्डा केल्याचा प्रकार घडला होता,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
दरम्यान,बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन पथके स्थापन करून अज्ञात लोकांना तत्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना कुंटूर पोलिसांना दिल्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी,पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले,संजय अटकोरे यांनी अवघ्या काही तासात खोदकाम करणाऱ्या तीन संशयीताना पकडुन त्यांच्याविरुद्ध चोरी करणे,एखाद्या धर्माच्या भक्ती स्थळाचा अपमान करणे यासह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.
यात अशोक विठ्ठल मैसनवाड वय ४५ ,बालाजी बाबू इरपे वय – ३२ दोघेही रा.बरबडा ता.नायगाव आणि विष्णू आनंदराव डुकरे वय – ३२ रा.कोरका पिंपळगाव ता. जि.नांदेड यांनी कृष्णर औद्योगिक वसाहतीत असलेल्या महादेव मंदिरात मंगळवारी रात्री गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
कुंटूर पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा १५८/२२ कलम ३७९,५११,२९५ भादवी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश निखाते, पोलीस जमादार संतोष कुमरे, लक्ष्मण सोनकांबळे,मोहन कंधारे,पोलीस कॉन्स्टेबल अशोक घुमे,रामेश्वर पाटील होमगार्ड यश काळेकर आदींनी मोलाची कामगिरी बजावली असून,अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे हे करीत आहेत.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या