पत्रकारास मारहाण ; माजी जि.प.अध्यक्षांच्या पुत्रावर गुन्हा दाखल ; वसतिगृहाबाबत बातमी छापल्याचा राग.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
अनुसूचित जातीच्या जेष्ठ पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पुत्रावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसतिगृहाबाबत बातमी छापल्याच्या रागातून मारहाणीची ही घटना घडली.

बिलोली तालुक्यातील बडूर येथील भिमराव गंगाराम बडूरकर एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करतात. जेष्ठ पत्रकार अशी त्यांची ओळख असून बिलोली शहरात असलेल्या विद्यानिकेतन मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह बंद असल्याबाबतची बातमी त्यांनी छापली होती. इतर वर्तमानपत्रांनी सुध्दा या बंद वसतिगृहाची दखल घेतली. या बातम्यांच्या रागातून, राजकीय पुढारी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे पूत्र सुनिल एंबडवार यांनी बातमी बदल दम देत मी जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा हाताळू शकतो तेंव्हा अशा बातम्यांनी काय होईल असे सांगितले.

दरम्यान वस्तीगृहाचा कारभार योग्य चालावा म्हणून बडूरकर यांनी स्वतः याबद्दल प्रशासनाकडे तक्रार दिली. विभागीय व जिल्हा स्तरावर तक्रार केल्यानंतर १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता चौकशी समिती बिलोलीला आली. त्यावेळी बडूरकर इतर पत्रकार मित्र रत्नाकर जाधव, शिवराज रायलवाड, साईनाथ शिरोळे आणि संजय जाधव वस्तीगृहाच्या चौकशी समितीला भेटून वृत्त मिळविण्यासाठी तेथे गेले.
येथे सुनिल बाबाराव एंबडवार यांनी जातीवाचक शब्द उल्लेखीत करून “तु येथे का आलास” असे म्हणाले. मला लाथाबुक्यांनी मारहाण केली. माझ्या इतर पत्रकार मित्रांनी मला त्याच्या तावडीतून सोडवुन बाहेर आणले. असे नमुद करीत सुनिल एंबडवार विरुध्द पत्रकार संरक्षण कायदा आणि अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पोलिसांत दिली.
यावरून बिलोली पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४, ५०६ आणि अॅट्रासिटी अॅक्टनुसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मा.सचिन सांगळे यांच्याकडे पत्रकारांनी स्वाक्षरी केलेले निवेदन देवून एंबडवार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.
रत्नाकर जाधव, प्रकाश पोवाडे, दादाराव इंगळे, राजु शिंपाळकर, गणेश कत्तुरवार, वल्लीओद्दिन फारुखी, माधव येडके, सतीष बळवंतरकर , सय्यद रियाज, संजयकुमार पोवाडे,धम्मपाल जाधव, सुनिल जेठे गणपत धर्मपूरे, सामाजिक कार्यकर्ते मुकींदर कुडके यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या