भोवतालचे वातावरण पार बिघडून गेले आहे. या वातावरणाच्या वावटळीत स्वतः लेखकही सापडलेला आहे. तोही या अवकाशात गिरक्या घेत आहे. परंतु तो सजग आहे आणि ही सजगता ठेवूनच सर्व अनुभवांची आणि जाणिवांची- संवेदनाची जंत्री एकत्रित करीत ‘शाळा’ ही कादंबरी लेखक ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांनी आपल्या हाती दिली आहे. ती आता आपणाला तेवढ्याच सजगतेने समजून घ्यावी लागेल असे उद्गार प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांनी काढले.
ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांच्या ‘शाळा’ या कादंबरीचा प्रकाशन समारंभ नायगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक देवीदास फुलारी हे होते तर तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबू बिरादार, शंकर वाडेवाले, केशवराव पाटील चव्हाण, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, माधवअप्पा बेळगे, गटशिक्षणाधिकारी मोहनराव कदम हे उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘शाळा’ कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. यानंतर लेखक ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांनी मनोगतातून शासनाने शिक्षकांपुढील समस्यांचा डोंगर हटवावा आणि त्यांना विद्यार्थ्यांना घडवू द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
बाबू बिरादार पुढे म्हणाले की, शैक्षणिकविश्वाला कादंबरीचे स्वरूप दिल्यामुळे एक नवीन विश्व साहित्यात आले आहे. त्यामुळेही ही कादंबरी महत्त्वपूर्ण ठरते. ग्रंथलेखन करीत असतानाची मनस्थिती सांगणे कठीण असते. महत्त्वाचा विषय उत्तम प्रकारे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत असेही ते म्हणाले. देवीदास फुलारी म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील आजची बिघडलेली परिस्थिती सुधारावी याची तळमळ या लेखकास आहे. यातील पात्रेही छान रंगविली आहेत. ‘शाळा’ कादंबरी वाचताना आजूबाजूलाच हे घडते आहे असे वाटते.
कादंबरीसाठी लेखकाने परिश्रम घेतले आहेत. आपण स्वतःही या परिस्थितीत अडकलो आहोत हे माहीत असूनही हा लेखक त्यावेळेस शांत राहतो व अंतरातील एका सज्जन व्यक्तीची तळमळ नंतर विधायक मार्गाने व्यक्त करतो हे त्यांचे मोठेपण होय असे त्यांनी म्हटले.शंकर वाडेवाले यांनी कादंबरी वाङ्मय प्रकाराचा आढावा घेऊन शिक्षण क्षेत्रातील एक उत्तम कादंबरी म्हणजे ज्ञानेश्वर शिंदे यांची ‘शाळा’ होय असे म्हटले. भाषेच्या सामर्थ्यामळे कादंबरीचे भाषावैभव वाढले आहे.
सर्वांच्याच जीवनाशी निगडित ही कादंबरी असल्याने सर्वांनी सजगतेने वाचावी असेही म्हटले. शिवराज पाटील होटाळकर यांनी शिक्षण विभागाला चांगले स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न होता व राहील असे सांगून त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. मोहनराव कदम यांनीही यावेळी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कवी वीरभद्र मिरेवाड यांनी केले तर आभार अविनाश कोल्हे यांनी मानले.
समारंभाला शं. ल. नाईक, लक्ष्मण मलगिरवार, नारायण शिंदे, बाळू दुगडूमवार, विजयकुमार चित्तरवाड, नागोराव उतकर, पंडित पाटील, आनंद रेनगुंटवार, सोपान देगावकर, भास्कर शिंदे, पांडुरंग पुठ्ठेवाड, सरोज शिंपाळे, भाऊराव मोरे, भाऊसाहेब वडजे, प्रकाश पाटील भिलवंडे, साईनाथ चव्हाण, नारायण शिंदे, व्यंकट अनेराये, देविदास पाटील वडजे, सर्जेराव देशमुख, भास्कर चव्हाण, सरपंच राजू पाटील, माधवराव शिंदे, बेळगे सर, गाजलवड सर, गजानन चौधरी, डॉ.प्रा. शिवाजीराव पाटोदे, बाळासाहेब पांडे,गंगा सागरे, गोविंद नरसीकर, मारोती पाटील शिंदे, चंदणकर, व्यंकट पवार, किशन कदम, भास्कर कदम, शिंदे परिवार आदी उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy