राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध पोलीस चौकशीला परवानगी देण्याची मागणी !
मुंबई/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या अपहार प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देण्याची राज्यपालांकडे मागणी
पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या इ.जि.मा आणि ग्रा.मा कामातील अपहार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दरबारी
जिल्हान्यायालयात अपहार झाल्याचे सकृत दर्शनी मान्य. राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष.
सोमवारी सायंकाळी ५ वाजता राजभवन येथे शिष्टमंळासह ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अकोला न्यायालयाने पालकमंत्री बच्चू कडू यांनी बनावट दस्तऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करून जो अपहार केला त्याबद्दल न्यायालयाने श्री. बच्चू कडू सकृतदर्शनी दोषी असल्याचे निरीक्षण दिले असल्याची माहिती राज्यपालांना देण्यात आली. तसेच त्यांच्या विरुद्ध चौकशी सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. या प्रसंगी राज्यपाल महोदयांनी संपूर्ण कागदपत्रे बघून या प्रकरणात कायद्याने राज्यपाल यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे अशी तरतूद असल्याचे कायदेशीर दस्तावेज सादर करायला सांगितले आहे.
तसेच मागितलेली कायदेशीर कागदपत्रे सादर केल्यानंतर तात्काळ अकोला पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्री श्री. बच्चू कडू यांची चौकशी करण्याचे निर्देश दिल्या जातील असे सांगितले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि मुंबई महानगर अध्यक्ष अबुल हसन खान हे उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा नियोजन समितीने ठरवून दिलेल्या रस्ते कामात फेरफार करत आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचे देखील नाव याप्रकरणी प्रामुख्याने समोर आले आहे. काही इतर जिल्हा मार्ग (इ.जि.मा) आणि ग्राम मार्ग (ग्रा.मा) हे शासन मान्य क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी जिल्हा परिषदेला पाठवून कडू यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते. या संदर्भातील सर्व पुरावे आणि संबंधित माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा नियोजन समितीने नियोजित न केलेले इ.जि.मा आणि ग्रा.मा नंबर इ-टेंडरींग मध्ये टाकून त्याकरिता आलेला निधी देखील लागोलग काढल्याचे आरोप पालकमंत्री कडू यांच्यावर आहे. या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकरभे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देखील या संदर्भात निवेदन दिल्याची माहिती ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. कलम १५६/३ अंतर्गत जिल्हान्यायालयात याचिका करण्यात आल्याचे देखील आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात या प्रकरणात तथ्य आढळल्यास महाविकास आघाडी कारवाईसाठी अनुकूल राहते का? याकडे पाहणे लक्षवेधी ठरेल.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy