बरबडा शिवारातून होणाऱ्या मातीच्या अवैध वाहतुकीमुळे रस्त्याची लागली वाट !

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगांव तालुक्यातील बरबडा शिवारात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन होत असल्याने,नुकताच तयार करण्यात आलेल्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून ठीक ठिकाणी नवीन रोड दबल्या गेला सोबत रस्त्याची माती झाली त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मागील दहा दिवसाच्या काळात केवळ दोनशे ब्रासची परवानगी असताना सुमारे 25 – 30 हायवाद्वारे दिवसभर माती वाहतूक सुरू होती . केवळ दोनशे ब्रास माती उत्खनन एक ते दोन दिवसातच पुर्ण होते.

संबंधित प्रशासन दहा दिवस कसं काय परवानगी देते ? संबधित प्रशासन आणि माती माफियात संगनमत तर नाही ना ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.याकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांना तसेच या भागातील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असून,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तत्काळ याकडे लक्ष देऊन अवैधरित्या होणारे माती उत्खनन थांबवून याची मोजणी करावी आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी भाजपाचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी केली.
    इतकेच नाही तर काही लोकांनी हा प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चित चांडक यांना कळविला असता आज बुधवारी कुंटूर पोलीस ठाण्याचे एक पोलीस पथक प्रत्यक्ष माती उत्खननाच्या ठिकाणावर आले होते. मात्र पोलीस पथक येण्याचा सुगावा लागताच सर्व हायवा (डंपर ) वाहने ताबडतोब पसार झाले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कुंटूर पोलीस ठाण्याहून सपोनि विषाल बहात्तरे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश येवले, संजय अटकोरे, पोलीस कॉन्सटेबल सोनकांबळे,शंकर बुध्देवाड, भार्गव सुवर्णकार यानी स्थळ पाहणी केली यावेळीसुदर्शन धर्माधिकारी, शंकर पवार हे गावातील नागरिक उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या