परमार्थात ज्याला गती पाहिजे त्याने भगवंताचे स्मरण करावे ; भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांचे प्रतिपादन 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 जगाच्या कल्याणासाठी भगवंताचा अवतार झाला आहे. आणि भगवंताचा अवतार म्हणजेच संत आहेत. संत आणि भगवंताचे स्मरण करा ध्यान करा वंदन करा तरच आपले जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच ज्याला परमार्थात गती पाहिजे त्यांनी भगवंताचे स्मरण केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांनी केले आहे.
नायगाव तालुक्यातील कहाळा खुर्द येथील अखंड दत्त नाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि कळशारोहना निमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेत ते बोलत होते.
श्री दत्तात्रेय जयंती सोहळा निमित्ताने मठ संस्थान कहाळा खुर्द येथे संत श्री बालयोगी देवपुरी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
 दिनांक 27 डिसेंबरपासून भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. बेलगावकर महाराज पुढे म्हणाले, मनाची शुद्धी ध्यानाने होते, तनाची शुद्धी स्नानाने होते आणि धनाची शुद्धी दानाने होते असे सांगताना आपण संसारी जीवाचे ध्यान करतो सत्ता संपत्ती याचे ध्यान करतो सामान्य विषयाचे आपण चिंतन करीत असल्याने प्रत्येक मानव चिंतातूर झाला आहे. चिंता करण्यापेक्षा भगवंताचे चिंतन करा आणि आपले मन प्रसन्न ठेवा. या भूमीत जन्मलेल्या प्रत्येक संतांनी आपल्या जीवनात फक्त आणि फक्त भगवंताचेच ध्यान केले आहे. म्हणूनच आजही संत अजरामर आहेत. भगवंतापेक्षा संताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण संत म्हणजेच भगवंताचे अवतार आहेत. संतांच्या जीवनात डोक्यात हृदयात वाणीत आणि कानात फक्त भगवंत बसलेला आहे. म्हणून अशा संतांच्या सेवेकरीता भगवंतांनी अवतार कार्य केले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत मीराबाई, सावता महाराज, भक्त पुंडलिक, संत एकनाथ महाराज यांच्यासह अनेक संतांनी आपल्या जीवनात भगवंताच्या नामाचा जयघोष केला आहे. मृत्यू कसा असावा यासाठी संतांचे चरित्र आत्मसात करण्याची गरज आहे. कारण संतांचा मृत्यू हा आदर्श आहे. म्हणूनच अनेक संतांनी मृत्यूपूर्वीच आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असे लिहून ठेवले. अलीकडच्या काळातील गोरठा येथील स्वामी वरदानंद भारती यांनी आपल्या जीवनाचा अंतिम श्वास वरद नारायणाच्या नामाने घेतला आहे अंतकाळी त्यांना वरद नारायणाने दर्शन दिल्याचे त्यांचे चरित्र भागवत कथेच्या माध्यमातून बेलगावकर महाराजांनी सांगितले आहे.
बेलगावकर महाराज पुढे म्हणाले, परपिडे सारखे दुसरे पाप नाही आणि परोपकारासारखे दुसरे पुण्य नाही. इतरांना दुःख न देता जीवन जगा दुसऱ्याला दुःख दिले की पाप होते. मन चंचल होते आणि जीवनात दुःखे येतात. म्हणूनच तुका म्हणे फार थोडा तरी करा परोपकार याचे चिंतन सांगितले. ज्याचं आचरण मंगल आहे. ते संत आहेत. संतांच्या जीवनात कसल्याच प्रकारचा स्वार्थ आलेला नाही. त्यांचे जीवन हे निस्वार्थ आहे. असेही महाराजांनी आपल्या भागवत कथेच्या माध्यमातून सांगितले आहे.
याप्रसंगी दत्त मठसंस्थान कहाळा येथील बालयोगी देवपुरी महाराज, मल्हारी माळसाकांत संस्थानातील संस्थानाधिपती निळकंठ महाराज कहाळेकर, वेदमुर्ती दिलीप महाराज लोणावळेकर, गायनाचार्य कालिदास महाराज, मृदंगाचार्य श्याम महाराज सताळकर, हरी महाराज बेलगावकर, शिवानंद वट्टमवार, विनोद गंदेवार, रमेश चिद्रावार, नरेंद्र येरावार, सूर्यकांत गुंडाळे, अविनाश मारमवार, बालाजीराव वाघमारे, सूर्यकांत कापशीकर यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.
 27 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या धार्मिक सप्ताहाची सांगता दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. दोन जानेवारी रोज मंगळवारी सकाळी दहा वाजता कळशारोहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दत्त मठसंस्थान आणि समस्त कहाळा खुर्द येथील गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या