बौद्ध समाजाला भाजपा – काँग्रेस ने दिला लॉलीपॉप !

बौद्ध समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज ।

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज असूनही आज पर्यंत जे घडलं तेच यंदाच्या विधानसभा पोटनिवडणुकीत बौद्ध समाजाला डावळून काँग्रेस व भाजपाने इतर समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असली तरी, खऱ्या अर्थाने बौद्ध समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
देगलूर बिलोली मतदार संघाचे दिवंगत आमदार कै. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्या अनुषंगाने महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी व अन्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे अनुसूचित जातीच्या अनेक इच्छुकांनी भाजपा, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व अन्य पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यामध्ये महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षातर्फे कै.रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापुरकर, मंगेश कदम, भीमराव क्षीरसागर, गंगाधर सोंडारे, भाजपा कडून धोंडिबा कांबळे, प्रा.उत्तमकुमार कांबळे, वंचित बहुजन आघाडी डॉ.उत्तम इंगोले यांनी उमेदवारी मागितलं होती.
असे असले तरी शिवसेनेकडून तीन वेळा आमदार झालेल्या व आयत्या वेळी भाजप मध्ये प्रवेश केलेल्या सुभाष साबने यांना भाजपा कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. तर काँग्रेस कडून कै.रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव यांना महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली. वंचित बहुजन आघाडी कडून डॉ.उत्तम इंगोले यांना उमेदवारी देण्यात आली.
 देगलूर -बिलोली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाची संख्या असूनही भाजप व कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी न देता अन्य समाजाच्या व्यक्तींना उमेदवारी देऊन बौद्ध समाजाला डावलण्याचे काम केले आहे अशी चर्चा देगलूर बिलोली मतदारसंघात आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाज हा वंचितच्या मागे गेल्याच्या कारणाने आत्ता होऊ घातलेल्या विधानसभा पोट निवडणुकीत दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी बौद्धांना उमेदवारी नाकारली असेल तर या दोन्ही पक्षांना विचार करावा लागेल. तसेच बौद्ध समाजाने सुद्धा आत्मपरीक्षण करावे लागेल. असे असले तरी या विधानसभा पोटनिवडणुकीत कोण निवडून येणार हे मात्र बौद्ध समाजाच्या भूमिकेवर ठरणार आहे….

ताज्या बातम्या