“वांग्याची” शेती करावी तर ती उस्मानाबादच्या सत्यवान सुरवसेंनीच..

[ संतोष द पाटील ]

उस्मानाबादच्या शेतकरी सत्यवान सुरवसेना वांगेसम्राट म्हणता येईल ?? दुष्काळात रडणारे अनेक पण लढणारे कमी ! उस्मानाबादच्या शेतकऱ्याची यशोगाथा.

सहा महिने, सहा एकर, 300 टन वांगी, 72 लाख उत्पन्न, उस्मानाबादच्या शेतकऱ्याची यशोगाथा, शेती म्हटलं की आपल्याकडे नाकं मुरडतात किंवा शेतीत काय मिळतं? शेती करुन काय फायदा? शेतमालाला भाव तरी मिळतो का? असे शेकडो प्रश्न विचारले जातात. अर्थात त्यातले काही बरोबरही आहेत. कारण आपल्या सरकारच्या धोरणामुळं शेतकरी शेतीपासून दुरावू लागला आहे. पण जर बाजारपेठेचा अंदाज घेऊन, पिकाचं योग्य नियोजन करुन आणि त्याचं दणकट मार्केटिंग केलं, तर काय होतं, हे दाखवून दिलंय तुळजापूर तालुक्यातील मोर्टा गावच्या शेतकऱ्यानं. त्यांचं नाव आहे सत्यवान सुरवसे.
सहा एकरात, सहा महिने पिकवलेल्या वांग्यानं त्यांना ७२ लाख रुपये मिळवून दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी दुष्काळानं त्यांच्या जमिनीला भेगा पाडल्या. तुळजापुरातल्या मोर्टा गावच्या सत्यवान सुरवसेंनी आपली 12 एकरवरची द्राक्षबाग भुईसपाट केली. वाटलं सगळं काही संपलं. पण दृष्टांत व्हावा असं काही तरी झालं आणि सत्यवान यांच्यावर दुष्काळात पैशाचा पाऊस पडला. द्राक्ष बागा मोडल्या पण बागेच्या अँगलनं वांग्याला आधार दिला. आणि वांग्यानं सुरवसेंना.
6 एकरात मोठ्या जिद्दीनं वांग्याची रोपं लावली. घरातला प्रत्येकजण शिवारात राबू लागला. आणि 2 महिन्यांनी पहिलं फळ हाती आलं. वांगं… तेही छोट्या फणसाएवढं किंवा दुधी भोपळ्याएवढं. 6 महिने, 6 एकर, 300 टन वांगी आणि उत्पन्न तब्बल 72 लाख रुपये. आतापर्यंत 7 एकरच्या मालकीण असलेल्या सुरवसेताई थेट 95 एकरच्या मालकीण झाल्या आहेत. पण ही काही लॉटरी नव्हती. त्यामागे होते अपार कष्ट. कारण इथे ना पाणी होतं, ना काळी जमीन.फक्त पीक घेणं हे आव्हान नव्हतं, तर इतक्या पिकाला मार्केटही मिळायला हवं. म्हणून सुरवसेंनी थेट हैदराबादची बाजारपेठ गाठली. लग्नसराई साधली आणि मग काय 72 लाखांचा पाऊस.
सत्यवान सुरवसे फक्त दहावी पास आहेत. पण या अवलियानं खडकाळ जमिनीत सोनं पिकवलं. आज त्यांच्याकडे गाडी आहे. बंगला आहे. जमीन जुमला आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेचं अनुकरण आता अनेकजण करताहेत. दुष्काळात रडणारे अनेक असतात. पण लढणारे कमी. दुष्काळाला पुरुन उरलेल्या या सत्यवानाच्या दर्शनासाठी आता राज्यभरातून लोक येत आहेत. शेतीचं वांगं कसं करायचं हे अनेकांना कळतं. पण वांग्याची शेती करावी तर ती सुरवसेंनीच.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या