पाचशे वर्षांपूर्वीची कान्हेरी लेणी Buddhist Caves ‘Kanheri’ before Five Hundred Years.
[ Source Facebook – संजय सावंत ]
पाचशे वर्षापूर्वी महाराष्ट्र मुघल साम्राज्या विरुद्ध लढत होता तेंव्हा सात बेटांची मुंबई आकार घेत होती. त्यावेळी पोर्तुगीज,डच, फ्रेंच, इंग्रज यांच्यामध्ये व्यापारात मक्तेदारी स्थापन करण्याची अहमिका चालली होती. त्यांच्यात लढाया होत होत्या. महत्त्वाची बंदरे बळकावणे चालले होते. सन १६७० मध्ये मुंबई किल्ल्याच्या आजूबाजूचा सखल परिसर भरतीच्या पाण्यात बुडत असे. या रोगट मुंबईवर त्यावेळी पोर्तुगीजांचे राज्य होते.
तेंव्हा १६७२-१६८१ या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा एक सर्जन डॉ.जॉन फ्रेयर हा मद्रास वरून मुंबईत आला. त्यावेळी त्याने पाहिलेली मुंबई व तीचा आजूबाजूचा परिसर आणि कान्हेरी लेणी याचे प्रवास वर्णन लिहिले. ते सन १६९८ मध्ये लंडन येथे प्रसिद्ध झाले.( Letters from India and Partia ) त्याकाळी बुद्ध व लेण्यांतील शिल्पांबाबत काहीही माहिती पोर्तुगीजांना, इंग्रजांना, आणि स्थानिक भारतीय समाजाला नव्हती. घारापुरी आणि कान्हेरी येथील पाषाणातील कोरीव बांधकाम कोणी केले, कशासाठी केले, केंव्हा केले याचा इतरांप्रमाणे जॉन फ्रेयरला देखील प्रश्न पडला. त्याचा प्रवास वर्णनाचा वृत्तान्त खालील प्रमाणे आहे.
डॉ. जॉन फ्रेयर म्हणतो ‘मुंबई पोर्तुगीजांकडून आंदण म्हणून मिळाली तरी तीचा ताबा इंग्रजांना अद्याप मिळाला नाही. इथले हवामान अत्यंत रोगट आहे. घरे ठेंगणी आणि नारळाच्या झावळ्यांनी शाकरलेली आहेत. ताजे गोडे पाणी माझगाव टेकडीच्या झऱ्यातून आणावे लागते. वरळी टेकडीवर इंग्रजांचा टेहाळणी बुरुज आहे. मलबार टेकडीवर झाडी असून तेथील उतारावरील तलावा जवळ प्रचंड स्तूपाचे ( पॅगोडाचे ) अवशेष बघितले. ( याचा अर्थ मुंबईतील मलबार हिलवर हजारो वर्षांपूर्वी स्तूप नक्कीच असावा ) माहीम वरून बोटीने वांद्रे गावात आलो. तेथे एक विद्यापीठ आणि त्याच्या समोरचा क्रूस बघितला. सेंट ॲद्रू चर्च बघितले. नवीन बांधलेला किल्ला बघितला. इथली सर्व घरे कौलारू आहेत.
तेथील फादरने चांगला पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी कानोराईन ( कान्हेरी) लेणी बघण्यासाठी काही नामांकित लोंकाबरोबर निघालो. सोबत नोकर-चाकर, घोडे, पालख्या यांचा लवाजमा होता. वाटेत मोर, पारवे व हरणे यांची शिकार केली. दुसऱ्या दिवशी दुपारी मागाठणे वरून कानोराईन टेकडीपाशी आलो. तेथील जंगलात वानर, वाघ, रानरेडे आणि कोल्हे यांचे कळप बघितले.
कानोराईन टेकडीवर चढल्यावर तेथील खडकात पाण्याची असंख्य कुंडे बघितली. खडक तापलेला होता पण आतील पाणी थंडगार होते. इथे दोन प्रचंड मोठे दगडी पुतळे आहेत. ( बहुतेक बुद्धमूर्ती पाहिली असावी ) इथले प्रवेशद्वार अतिशय सुंदर आहे. तेथील पोर्चच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रतिमा आहेत. आतमध्ये अंधार आहे. छत कमानदार असून प्रचंड खांबावर तोललेले आहे. ( बहुतेक चैत्यगृह पाहिले असावे ) हत्ती, घोडे, सिंह यांच्या प्रतिमा सगळीकडे आहेत. एके ठिकाणी अनेक डोकी असलेला भीतीदायक पुतळा आहे. ( लेणी क्र.२३ मधील अवलोकितेश्वराची मूर्ती बघितली असावी ) ५० चौरस फूट आकाराचा दरबार बघितला. तेथे सर्वत्र मानवी आकृत्या आहेत. ( मोठ्या विहारा बद्दल लिहिले असावे.) वरील बाजूस राजाचा मोठा राजवाडा आहे.’ ( डॉ. जॉन फ्रेयर याला कान्हेरी लेणी म्हणजे प्राचीन भारतीय राजाचे व त्याच्या सरदारांचे निवासस्थान वाटले )
‘हे संपूर्ण कानोराईन बघण्यास एक महिना लागेल इतके मोठे ते स्थळ आहे. येथील उंच टेकडीवर गेलो तेंव्हा तेथे असंख्य खडकातील घरांची प्रवेशद्वारे बघितली. एवढे कष्ट कोणी केले, कशासाठी केले याची माहिती मिळत नाही. पण लोक या स्थळाचे फार कौतुक करतात. काहीजण सिकंदराचा हवाला देऊन सांगतात की त्याने हे बेट तयार करण्यासाठी कठीण खडकातून प्रचंड खिंड खोदून काढली. परंतु हे मूर्ती पूजकांचे काम असावे असे वाटते. या कानोरिय स्थळावर पोर्तुगीज यांचे राज्य आहे. ते या सुंदर स्थळावर तोफांच्या नेमबाजीची कवायत करतात. त्यामुळे कलाकुसर केलेल्या कामाच्या खुणा नष्ट होत आहेत. वसई येथे किल्ला आणि तलाव देखील बघितला. इथले पोर्तुगीज ख्रिश्चनांखेरीज कोणाला टिकू देत नाहीत.’ अशा तऱ्हेने डॉ. जॉन फ्रेयर याने कान्हेरी बेटाची पाहणी केल्यावर वृत्तांत लिहिलेला आहे.
संदर्भ : मुंबई शहर गॅझेटियर (१९०९) अनुवाद-जयराज साळगावकर.(मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
Www.massmaharashtra.com