मास्क,सोशल डिस्टन्सींग नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई !

■ बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी बंधनकारक
(ठाणे प्रतिनिधी-सुशिल मोहिते)

कोविड १९ चा वाढता संसर्ग लक्षात घेवून हे संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोविड 19 ची वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रूग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन,रेड झोन, प्रतिबंधीत क्षेत्रात कडक निर्बंधासाठी गस्ती पथकांची नियुक्ती करण्याबरोबरच वेळप्रसंगी नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांनी आज दिला.

कोविड 19 रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ठाणे महानगरपालिकेने केलेल्या प्रतिबंधात्मक उपुाययोजनांची माहिती देण्यासाठी आज नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक करवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स,लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

शहरातील रेड झोन,कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, मार्केटस् घाऊक बाजारपेठा,भाजीपाला मार्केटस् याठिकाणी अनावश्यक गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या प्रभाग समिती निहाय व्यापक जनजागृती, रिक्षांमधून नागरिकांना आवाहन करणे आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे.

कोविड १९ सदृष्य लक्षणे असलेल्या नारिकांची कोविड चाचणी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा,रेल्वे स्टेशन्स,बस स्टॅाप, एसटी स्टॅन्ड आदी ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार असून चाचण्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.दरम्यान महापालिकेची विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर्स पुन्हा पूर्व क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास खासगी रूग्णालये कोविड केअर सेंटर्स म्हणून अधिगृहित करण्यात येतील असे सांगून याबाबत शहरातील डॅाक्टर्स, त्यांच्या संघटना यांच्याशी समन्वय सुरू आहे.

त्याबरोबर कोविड १९ चाचण्यांसाठी आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोग शाळा व्यवस्थापनांशीही चर्चा सुरू असून शहरात जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात याचे नियोजन करण्यात आले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त आणि संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना सूचना देण्यात आल्या असून ज्या ठिकाणी गृह विलगीकरणाची सुविधा नसेल तेथील जोखीम गटातील व्यक्तींना महापालिका विलगीकरण कक्षात सक्तीने विलगीकतरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेचे वॅार रूम आणि मुख्य कोरोना नियंत्रण कक्ष आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला असून रूग्णवाहिका व्यस्थापन आणि बेड व्यवस्थापन प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे. यासाठी आवश्क ते मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांतील हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्ती पथके नियुक्त करण्यात येणार असून या ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू करणे, घरोघरी जावून तपासणी करणे,वयोवृध्द तसेच विविध व्याधी असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेणे,त्यासाठी तपासणी आणि चाचणी शिबिरांचे आयोजन करणे,फिरती तपासणी केंद्र निर्माण करणे आदी कृतीशील उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, बस स्थानक, एसटी स्थानक या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी आणि चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून या ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या