पंचायत समितीचा अजब कारभार ; भ्रष्टाचाराने पोखरले, घरकुलाच्या योजनेच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे प्रत्येक कुटुंबाला घर मिळेल असे आश्वासन देत असताना नायगाव पंचायत समितीच्या वतीने भ्रष्ट अधिकारी यांच्या संगणमताने शासनाच्या विविध योजनेतून नागरिकांना मिळालेल्या घरकुलात भ्रष्टाचार केल्याने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मिळाले पण बांधकाम न करताच बिले उचलून घेण्याची व देण्याची मोहीम नायगाव पंचायत समितीमध्ये सुरु आहे. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंकुश पाटील रातोळीकर यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांचेकडे केली आहे. 
      नायगाव पंचायत समितीचा सध्या रामभरोसे कारभार सुरु असल्याने कुणाचा पायपोस कुणाला राहीला नाही. परिणामी अनागोंदी कारभाराने कळस तर गाठलाच आहे पण चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ करण्याची मोहीमच पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंता राबवत आहेत. आजच्या परिस्थिती नायगाव तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचे ४४८ अपूर्ण, रमाई आवास ६५७ तर मोदी आवास योजनेचे ११३० घरकुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहेत. अपूर्ण असलेली घरकुले पुर्ण करण्याऐवजी ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंत्यांनी बोगस बिले अदा करण्याचा नवीन पँटर्न पंचायत समितीमध्ये राबवत आहेत. 
      तिन्ही योजनेच्या घरकुलांचे कामे पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी १० ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या अभियंत्यावर आहे. मात्र हे अभियंते बांधकाम केले नसले तरी बोगस बिले अदा करत आहेत. आणि ज्यांनी प्रत्यक्षात घरे बांधली आहेत त्यांना मात्र बिले अदा करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शासकीय योजनेचे घरकुल बांधतांना वेगवेगळ्या टप्प्यावर बिले अदा करण्याची पध्दत आहे. बिले अदा करतांना लाभार्थ्यांचे बांधकाम कुठल्या टप्प्यावर आहे याची खात्री करण्याचा नियम असून बांधकाम सुरु असलेल्या जागेवर किंवा बांधकामावर उभ असलेला फोटो घेण्यात आल्यावर बिल अदा करण्यात येते. 
     नायगाव पंचायत समितीचे काही ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंत्यांनी लाभार्थ्यांनी घरकुल बांधले नसले तरी दुसऱ्याच्या बांधकाम केलेल्या घरासमोर उभ राहून काढलेल्या फोटोच्या आधारे बिल अदा करण्याचा सपाटा लावला आहे. लाभार्थ्यांने खरोखरच घरकुल बांधले आहे का याची कुठलीच खातरजमा करण्यात येत नाही. त्यामुळे मागच्या वर्षभरात घरकुलाची बिले अदा करण्यासाठी खात्री केलेल्या फोटोची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अंकुश पाटील रातोळीकर यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांचेकडे केली आहे.
www.massmaharashtra.com