अतिवृष्टीने खरीप पिके गेली वाया ; उभ्या सोयाबीन ला फुटले कोंब !

[ विशेष प्रतिनिधी – रियाज पठान ]
लोहा तालुक्यात एकदा ढगफुटी तर दोन वेळा संततधार पावसाच्या अतिवृष्टीने उरली सुरली खरीपाची पिके वाया गेली. अनेकांच्या जमीनी खरडून गेल्या. कुठेतरी शिल्लक राहिलेल्या उभ्या असलेल्या सर्वच हिरव्या सोयाबीनला कोंब फुटले. वाळलेल्या सोयाबीन नासून काळी पडून नष्ट झाली. कापसाची बोंड नासली, कापूस पिवळा पडला.
सातही मंडळात अतिवृष्टीमुळे चालू वर्षी पावसाने हाहाकार उडाला असून खरीप हंगाम येण्याच्या तोंडावर अतिवृष्टीने पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पेरण्या मृग नक्षत्रात झाल्यामुळे परतीच्या पावसाने गाठल्याने शेतकरी वर्गावर फार मोठे संकट ओढावले. उडीद, मूग तर यापुर्वीच अवर्षणाचे हातचे गेले.शेतकरी संकटात सापडला.
उर्ध्व मानार लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेने भरले.ठराविक प्रमाणानूसार पाण्याचा वेळोवळी विसर्गही होत असल्याने दोन्ही लोहा कंधार तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.यापुर्वी अनेक वेळा पुराच्या पाण्यात जिवीत हानी होवुन मनुष्य हानी, पशूहानी, निवारा गेल्याने शेतकरी कुटुंब उघड्यावर पडली.
नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या. पिके जलमय झाली. खरिप हंगाम पुर्णतः धोक्यात आली. प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. शेतामध्ये पाणी साचल्याने पिके जावून तणांचे जोर केला. पारडी, कारेगाव, सायाळ, खडक मांजरी, धावरी, बेनाळ, हळदव, सावरगाव, देऊळगाव, बेरळी, मस्की, हिप्परगा, मुरंबी, रिसनगांव, कदमवाडी, चोंडी, सह तालुक्यातील सर्वच मंडळात अवेळीच्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे कागदी घोडे नाचवत बसण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पिकविमा द्यावा, सरसकट कर्ज माफ करावे याकरिता मागणी सर्व पक्षीय, विविध संघटनांनी केली.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा त्याच्यावर अशी अतिशय वाईट वेळ आली आहे. यातून कधी सावरणार म्हणून शेतकरी निराश झाला आहे. केंद्र व राज्य शासनाने गांभीर्याने घ्यायची वेळ आली आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या