पाडळी आणि पारोळा येथील चर्मकार युवती अत्त्याचार प्रकरणी समता परिषदेच्या वतीने राज्यपालांना निवेदन सादर !

नांदेड (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील चर्मकार समाजाच्या युवतींवरील अत्त्याचार प्रकरणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.

या दोन्ही प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.

मा. राज्यपाल, राज भवन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या मार्फत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या शिष्टंडळासह हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, सल्लागार शिवानंद जोगदंड, युवा जिल्हाध्यक्ष संतोष बोराळकर, तालुकाध्यक्ष हणमंत निंबाळकर, शहराध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, महिला नेत्या अनिता देगलूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रामध्ये कुणाच्याही अध्यात मध्यात न जाता गुण्या गोविंद्याने राहत असलेल्या तसेच काबाडकष्ट करून जीवन जगत असलेल्या अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील पुरुष, महिला व युवक, युवतींवर वर्णद्वेषी, धर्मांध व जातीयवादी भावनेतून अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्याय अत्त्याचार वाढलेले आहेत. आमच्या आया बहिणींच्या इज्जती लुटल्या जात आहेत. अनेकांचे बळी जात आहेत. रोज कुठे ना कुठे असे भयंकर प्रकार घडत आहेत याकडे राज्यपालांचे या निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.

मंगळवार दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी पाडळी ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील 20 वर्षीय चर्मकार तरुणीवर दोन जातीयवादी उच्चवर्णीय नराधम तरुणांनी क्रूर बलात्कार केला आहे. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी सदर युवतीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन व विवस्त्र करुन तिचे अवमानजनक फोटो काढले आहेत.

अशीच माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना जळगांव जिल्हयातील पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील 20 वर्षीय चर्मकार समाजातील तरुण मुलीबाबत घडली आहे. बीएससी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या मुलीवर टोळी या गावातील उच्चवर्णीय समाजातील तरुणांनी तिचे अपहरण करुन गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक पाशवी बलात्कार केला. नंतर विष पाजून जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. ती मेली असे समजून मळ्यात टाकून आरोपींनी पलायन केले, परंतु ती जीवंत असल्याचे पाहून कुणीतरी तिला पारोळा येथील रुग्णालयात भरती केले. नंतर कुणीतरी तिच्या मामाला कळविले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे नेत असताना या तरुणीचा वाटेतच मृत्यू झाला. तत्पूर्वी तिने आपल्या आईला सांगितले की, टोळी येथील तीन उच्चवर्णीय जातीयवादी नराधमांनी सात नोव्हेंबरच्या रात्री तिच्यावर अनेकवेळा सामुहिक बलात्कार केला आहे. एका अनोळखी महिलेने त्या नराधमांना मदत केली आहे.

आपदग्रस्त मुलीच्या मामाने या प्रकरणी रितसर फिर्याद दिली असून पारोळा पोलीस स्टेशन येथे दहा नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास हलगर्जीपणा केला. स्थानिक समाज बांधवानी आंदोलन केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली, त्यानंतर रात्री बारा वाजता मयत तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दोन्ही संतापजनक घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, आपदग्रस्त कुटुंबाला तात्काळ प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत करण्यात यावी, दोन्ही आपदग्रस्त कुटुंबांचे तात्काळ सरकारी घर देऊन जिल्ह्याच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, ही दोन्ही प्रकरणे जलदगती न्यायालयात वर्ग करुन लवकर न्याय मिळण्यासाठी शासनाने विशेष सरकारी वकील नेमावा आणि लवकरात लवकर सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, राज्यात अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अमलबजावणी करण्यात यावी, तसे सर्व पोलीस स्टेशनला स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावेत, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, महामंडळाचे भाग भांडवल वाढवून देण्यात यावे अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.
उपरोक्त सर्व मागण्यांची गंभीर दखल घेऊन तात्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्र शासनाला द्यावेत नसता येणाऱ्या काळात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने सर्वत्र तीव्र आंदोलने करण्यात येतील असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे. या निवेदनावर सौ. शिंपल उतकर, अशोक हराळे, सुनील सोनटक्के, अनिल नांदुरे, बाळासाहेब देशमाने, सचिन निंबाळकर, अजय शेळके, संभाजी अन्नपूर्णे यांच्याही सह्या आहेत.

या निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – 32, मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – 32 आणि मा. सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – 32 यांना पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव पाठविल्या आहेत.

ताज्या बातम्या