शब्दांकन :- प्रा.डॉ.गोपाळ चौधरी (पानसरे महाविद्यालय,अर्जापूर) 9403882118
पानसरे महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. दिनकर भिमराव झेंडे आज आपल्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. रा.खानापूर जिल्हा उस्मानाबाद येथील प्राध्यापक दिनकर झेंडे यांनी 29 वर्षांपूर्वी इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून आपल्या अध्यापनाला पानसरे कनिष्ठ महाविद्यालयात सुरुवात केली.
सुरुवातीपासूनच इतिहास विषयाची जाण,गोडी व अभ्यास असल्यामुळे त्यांनी इतिहासाच्या अध्यापनाबरोबरच राष्ट्रभक्ती,देशप्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केले. कारण विद्यार्थ्यांना देशाचा भूगोल माहित करून देणे हे जेवढे महत्त्वाचे असते. तेवढेच इतिहासाचे ज्ञान व त्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हेही अत्यंत महत्त्वाचे असते.त्या विषयाची व आशयाची जाणीव त्यांच्यामध्ये त्यांनी नेहमीच निर्माण केली.
त्यामुळे इतिहास विषयाकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला व अवघड इतिहास सोपा करून त्यांच्या गळी उतरविण्याची हातोटी प्राध्यापक झेंडे यांची असल्यामुळे इतिहास विषयात विद्यार्थ्या जास्तीत जास्त गुण घेऊ लागले. पुढे प्रा. झेंडे यांनी इतिहास विषयातील पीएचडी ही संशोधनात्मक पदवी देखील प्राप्त केली.
तसेच इतिहास विषयात सेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. त्याचा या शैक्षणिक प्रगतीचा फायदा मुलांना शैक्षणिक बाबतीत नेहमीच होत असे. अत्यंत हलाखीच्या व गरिबीच्या परिस्थितीत त्यांनी आपली जीवनयात्रा सुरू केली. लहानपणीच्या गोष्टी सांगताना ते नेहमीच आम्ही लहानपणी कशाप्रकारे वाढलो.त्यात रुढी,परंपरा,अंधश्रद्धा याच्या वरवंट्याखाली रगडत असताना लहानपणी काही गोष्टी करायच्या नाहीत त्या कराव्या लागल्या.
काही अन्यायग्रस्त व धार्मिक प्रथा,परंपरा, रुढी त्याची चटके त्यांनीही लहानपणीच सहन केले.व त्यामुळे अनेक गोष्टी लहानपणी त्यांना कराव्या लागल्या हे ते नेहमीच चर्चेदरम्यान आम्हाला सांगत. पण अशाही परिस्थितीत त्यांनी उस्मानाबाद येथे गावाकडून जाणे येणे करून तर कधी वसतीगृहात तर कधी कुणाच्या रूमवर राहत शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण खानापूर तसेच पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षण उस्मानाबाद येथे झाले.
त्यात अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे आई-वडिलांनीही या गोष्टीला पाठिंबा दिला.पुढे बीए नंतर एमए इतिहास व बीएडची पदवी प्राप्त केल्यानंतर ते पानसरे महाविद्यालयात रुजू झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी प्रामाणिकपणे, जबाबदारपणे अध्यापन करून एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ख्याती प्राप्त केली. अध्यापना व्यतिरिक्त म्हणजे शैक्षणिक क्षेत्राशिवाय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा नेहमीच सहभाग राहिला. या सर्व कार्यक्रमासाठी आम्हा सर्वांना पाठिंबा असायचा, त्यामुळे ते आमच्या सोबत नेहमीच असायचे. नाट्य, गायन, संगीत यांची देखील त्यांना आवड असल्यामुळे त्यांचा महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमात नेहमीच सहभाग असायचा. महाविद्यालयात त्यांनी प्रत्येक विभागात म्हणजे क्रीडा, सांस्कृतिक, परीक्षा, एनएसएस, ग्रंथालय बुद्धिमत्ता चाचणी, स्पर्धा परीक्षा इत्यादी विभागात आवडीने व तळमळीने काम केले.
संगणकाचेही त्यांना ज्ञान असल्यामुळे सहकाऱ्यांचे सर्विस बुक चे काम व्यवस्थित करणे. पगार बिल, इन्कम टॅक्स या विभागाची जबाबदारी ही त्यांनी आतापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे व तळमळीने सांभाळली. याबरोबरच शेवटच्या काही महिन्यात त्यांच्याकडे स्टाफ सेक्रेटरी पदाची जबाबदारीही स्टाफने दिली तीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळली. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या वार्षिक सहलीसोबत येणे त्यांना विविध गड किल्ल्यांची अथवा त्या स्थळाची माहिती करून देणे हेही ते आवडीने करत. क्रीडा क्षेत्रात म्हणाल तर हॉलीबॉल,कबड्डी, बॅडमिंटन या खेळात त्यांना विशेष आवड होती.
आमच्या प्राध्यापकांच्या टीमचे ते कॅप्टन असायचे ते सोबत असले म्हणजे आमच्या संघाचा विजय नेहमीच निश्चित असायचा.प्राध्यापक झेंडे सरांचा एकूणच दृष्टिकोन हा नेहमीच शैक्षणिक व सामाजिक असा राहिलेला आहे. अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे त्यांच्या अडीअडचणी सोडविणे त्यांना अनेक वेळा मदत करणे हा त्यांचा नेहमीचा भाग होता. तसेच विविध व्याख्यानमाला, शिबिरे, चर्चासत्रे, महाविद्यालयातील विविध स्पर्धा यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. आमच्या स्टाफरूम मधील वातावरण त्यांच्यामुळे हसत खेळत व रंजक असायचे. त्यांच्याबरोबर विविध विषयावर म्हणजेच समाजकारण राजकारण, धर्मकारण याविषयी आम्ही नेहमीच चर्चा करायचो.यात त्यांची मते जाणून घेणे आम्हाला नेहमीच आवडायचे.
खरे तर आजही आमच्या सर्वांच्या तोंडी प्राचार्य म्हणून गोविंदराव गोपछडे प्राचार्य डॉ.किरण देशमुख डॉ. मेहत्रे डाॅ. चव्हाण प्रा. अनिल देशपांडे प्रा. कमटलवार यांचे नाव असे. या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्यांची ही जडणघडण झाली. झेंडे सर व आम्ही सर्वजण म्हणजे 1993 ला सोबतच या महाविद्यालयात रुजू झालो. प्रा. सगरोळीकर प्रा. गाडवे, प्रा. बिलोलीकर, प्रा. बैलके तसेच विज्ञान विषयाचे सर्व प्राध्यापक एक दोन वर्ष मागे पुढे असे रुजू झालो. आता प्रा. झेंडे सरांच्या निवृत्त होण्याने स्टाफ रूम मधील वातावरण अत्यंत क्लेशदायक असणार आहे. आमच्या सोबतचे अनेक प्राध्यापक आजपर्यंत निवृत्त झाले आहेत.पण झेंडे सर म्हणजे सगळ्यांना जोडणारा, साधणारा एक दुवा होता. अनेक अडचणीच्या व वादाच्या प्रसंगी ते मध्यस्थी करत ते वाद सोडविण्यासाठी त्यांचा आम्हाला नेहमीच फायदा झाला. एक आमचा मित्र आज निवृत्त होत आहे याचे दुःख आम्हा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना आहेच. परंतु सेवा निवृत्ती ही अटळ असते ती कधी ना कधीतरी घ्यावीच लागते. यापुढेही त्यांचे भावी जीवन असेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात समाजोपयोगी राष्ट्रोपयोगी जावो.तसेच निरोगी,सुखी,आनंदाचे व समाधानाचे जावो.हीच सदीच्छा.
या सर्व जीवनाच्या शैक्षणिक सामाजिक प्रवासात त्यांच्या यशात त्यांच्या सुविद्य पत्नीचा म्हणजेच आमच्या वहिनींचाही वाटा खूप मोलाचा आहे. आज त्यांची मुले ही पदवीधर झाली आहेत. मोठी मुलगी पुण्यात कंपनीत इंजिनियर म्हणून आहे. दुसरा मुलगा विज्ञान विषयात पदवीधर होत आहे .संसारातल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून आज ते एका सुस्थितीत असून एका जबाबदारीतून मुक्त होत आहेत. त्यामुळे प्राध्यापक झेंडे सरांची निवृत्ती ही महाविद्यालयासाठी न भरून निघणारी पोकळी असली तरी 29 वर्षापासून आमच्या सोबत असणारे आमचे मित्र झेंडे सर आज आमच्या महाविद्यालयातून निवृत्त होत आहेत याचे दुःख तर मनोमन आहेच. त्यांचे निवृत्तीनंतरचे पुढील जीवन आरोग्यदायी व आनंददायी जावो हीच सदिच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो पुनश्च एकदा त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छ.धन्यवाद..!
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy