” नामांतर लढा, सर्वसमावेशक आंदोलन. “

[ मुंबई – अरूण निकम ]
आज 14 जानेवारी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” नामांतराचा वर्धापनदिन. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच नामांतराच्या प्रदीर्घ लढ्यात जीवाची बाजी लावून लढतांना, हौतात्म्य पत्करलेल्या, माझ्या भीम बांधव आणि भगिनींना मनःपूर्वक अभिवादन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशातील पूर्वापार चालत आलेल्या अमानवी मनुवादी जाती प्रथेला प्रचंड हादरा देत मानव मुक्तीचा “न भूतो, न भविष्यती” असा प्रखर लढा उभारला. गोलमेज परिषदेत भारतीय जातीव्यवस्थेची लक्तरे जगासमोर मांडून, देशात मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची का आवश्यकता आहे. हे पटवून दिले. संविधानात दलित, मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद करून, त्यात राजकिय अधिकारांचा ही समावेश केला. स्वातंत्र्य, बंधुता, समतेचे तत्त्व स्विकारून सर्वांना समान पातळीवर आणले. स्त्रियांच्या सार्वभौम उत्कर्षासाठी लोकसभेत “हिंदु कोड बिल ” सादर केले.
ते स्थगित केले म्हणुन मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी माणसाला जनावरापेक्षा ही हीन ठरवुन, पशूतुल्य वागणूक देणार्‍या हिंदू धर्माला कंटाळून आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्विकारला. त्यामुळे सनातनी शक्तींनी त्यांचा कायम दूस्वास केला. या आकसापोटी त्यांच्याविषयी खोट्या वावड्या पसरवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. याच असूयेतून त्यांच्यावर जहरी टीका करून, त्यांना :देशद्रोही”, “धर्म बुडवे” ठरविण्यापर्यंत ह्या सनातनी जात्यंध मंडळींची मजल गेली. अशा व्यक्तीचे नाव “विद्यापीठाला” दिले म्हणुन अशा लोकांचा पोटशूळ उठला नसता तरच नवल वाटले असते.
आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या इतिहासात आपल्या उद्धार
कर्त्याचे नाव एखाद्या विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता अनुयायांनी आग्रही मागणी करीत, तब्बल 17 वर्षे अविरत आंदोलन केल्याचे हे एकमेव उदाहरण आहे.
मराठवाडा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागासलेला भाग. त्यातही दलित, पीडित, मागासलेल्या वर्गाची आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांच्या कैक पिढ्या शिक्षणापासून कायम वंचित राहिल्या. त्यामूळे गरिबी, लाचारी, आणि दारिद्र्य कायम त्यांच्या पाचवीला पुजलेले. दबलेल्या, पिचलेल्या गरीब समूहाने शिक्षण, त्यातही उच्च शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष होईल. उच्च शिक्षण समाज परिवर्तनाचे साधन असून गरीब, दुर्बल घटकांना ते मिळणे आवश्यक असल्याचे ठाम मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते. ह्या वर्गाला शिक्षणाची संधी मिळुन त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष व्हावा. ह्या उदात्त हेतूने त्यांनी कर्जाऊ रक्कम उभी करून निजामाकडुन औरंगाबाद मधील 169 एकर जागा विकत घेतली. या जागेची चार वेगवेगळ्या वेळी खरेदी खते नोंदली गेली आहेत. येथे त्यांनी 1950 साली मिलिंद महाविद्यालय बांधले.( येथे मिलिंद नावाची तीन वेगवेगळी महाविद्यालये असून, हजारो गरीब, दलित विद्यार्थी वसतिगृहाच्या सोयीसह अतिशय कमी खर्चात वर्षानुवर्षे शिक्षण घेत आहेत. ) याच्या पायाभरणी समारंभाला श्री. गोविंदभाई श्रॉफ व श्री. माणिकचंद पहाडिया उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना “महाविद्यालय चालेल काय?” अशी शंका व्यक्त करीत प्रश्न विचारला. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही, तर येथे विद्यापीठ उभारले जावे. अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि बाबांच्या प्रयत्नांना यश येऊन 1958 साली “विद्यापीठा” ची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव देण्यासाठी सरकारने समिती गठीत केली. त्यांनी मराठवाडा, औरंगाबाद, पैठण प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी अशी वेगवेगळी नावे सुचवली.
त्यात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचाही समावेश होता. परंतु “मराठवाडा विद्यापीठ” ह्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नंतरच्या काळात 1960 साली कोल्हापूरच्या विद्यापीठाला ” शिवाजी विद्यापीठ” असे नाव देण्यात आले. महाराजांच्या नावाचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यापीठीय स्मारक झाले नव्हते. म्हणुन औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने दिनांक 27 जुलै 1978 रोजी मंजूर करण्यात आला.
त्यामुळे पित्त खवळून जातीयवादी शक्तींनी त्याला कडाडून विरोध केला. ” तुमच्या घरात नाही पीठ, कशाला हवे विद्यापीठ ”
अशा कुत्सित आणि चिथावणीखोर भाषणांनी दंगलखोर जातीयवादी शक्तींना स्फुरण येऊन दंगलीची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळे सरकारने नामांतराची पुढील प्रक्रिया स्थगित केली. याविरोधात सर्व आंबेडकरी राजकिय गट, संघटना विविध मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातुन सातत्याने सरकारकडे नामांतराच्या मागणीचा पाठपुरावा करीत होत्या.
नागपूरच्या दीक्षाभूमीची राख कपाळावर लाऊन प्रा. जोगेंद्र कवाडे ह्यांच्या नेतृत्वाखाली “नागपूर ते औरंगाबाद ” असा लाँग मार्च “करो वा मरो” अशा निर्धाराने निघाला. त्यावर देखील लाठीमार केला गेला. कित्येक घायाळ झाले. अनेकांना तुरुंगात डांबले गेले. नामांतर आंदोलनात नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, बाबा आढाव, पुष्पा भावे, डॉ. कुमार सप्तर्षि आदी समाजवादी नेत्यांनी आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे आंदोलनाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली.
ह्या काळात गरीब आंबेडकरी वस्त्यांवर सामूहिक हल्ले करण्यात येऊन, घरांची जाळपोळ करण्यात आली. माय बहिणीवर बलात्कार करून त्यांचा अनन्वित छळ केला गेला. कित्येकांना गाव सोडावे लागले तर कैक जखमी झाले. संपूर्ण मराठवाडा जातीय आगीने होरपळून निघाला. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात थोड्या फार फरकाने आंदोलन सातत्याने सुरू होते. दलित वस्त्यांमध्ये आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार केव्हा होईल ह्याचानेमनव्हता. अशा स्फोटक परिस्थितीत देखील लढाऊ भीमसैनिकांनी आंदोलनाची तीव्रता कमी होऊ दिली नाही. नामांतरासाठी आंबेडकरी समाजाच्या भावना इतक्या तीव्र होत्या की ,नांदेडमध्ये गौतम वाघमारे या तरुणांने भरचौकात स्वतःला पेटवून घेतले. तो शेवटच्या श्वासापर्यंत “नामांतर झालेच पाहिजे ” अशा घोषणा देत होता. परभणी जिल्ह्यात पोचीराम कांबळे ह्यांचा हात, पाय तोडून खून करण्यात आला. जनार्दन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, रोशन बोरकर, चंदन कांबळे अशा कितीतरी लोकांनी हसत हसत मृत्यूला कवटाळले.
जसजशी आंदोलनाची तीव्रता वाढत गेली, राज्य सरकारची कोंडी झाली. अखेर राज्य सरकारने 14 जानेवारी 1994 रोजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ” या नावाला मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
नामांतरा विषयी लिहित असतांना केव्हा झोप लागली, कळलंच नाही. पहाटेच्या साखरझोपेत असतांना, मला अचानक बाबासाहेब मला दिसले. त्यांनी सर्व अनुयायी पुढाऱ्यांना एकत्र बोलावून सांगायला सुरुवात केली कि, मला खुप दिवसांपासुन तुमच्याशी बोलण्याचे मनात होते. मी आयुष्यभर कष्ट करून दबलेल्या, पिचलेल्या, गावकुसाबाहेर टाकलेल्या माझ्या गरीब बांधवांच्या संरक्षणासाठी, एव्हढी मोठी पोलादी संघटना ऊभी केली. परंतु माझ्या निधनानंतर, तुमच्या आपापसातील नेतृत्वाच्या भांडणांमुळे तिचे अनेक गटांमध्ये विभाजन करून शक्ति क्षीण केलीत. ते पाहून मी हतबल झालो. परंतु नामांतराच्या आंदोलनात तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या नावाने, परंतु एकाच प्रश्नावर सातत्यपूर्ण प्रखर आंदोलन उभारून नामांतराचा प्रश्न यशस्वीपणे पूर्णत्वास नेला. त्यामुळे मला समाधान वाटले. तुमच्या एक गोष्ट लक्षात कशी येत नाही की, तुम्ही जर वेगवेगळ्याने गटा ने आंदोलन यशस्वी करू शकता, तर तुम्ही एकत्रित एका झेंड्याखाली आलात तर प्रचंड मोठी ताकद निर्माण होऊन तुमचे अनेक प्रश्न सुटतील. मला हे ही माहित आहे की, प्रस्थापित लोक तुम्हाला एकत्र राहू देणार नाहीत. परंतु तुम्ही त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता, आपल्या ऐक्यावर ठाम रहा. असे जर तुम्ही करू शकला तर, तुमच्या गटबाजीला कंटाळून दुसर्‍या घरट्यात गेलेली पाखरं पुन्हा आपल्या मूळ घरट्यात येतील ह्याची मला खात्री आहे.
त्यामुळे कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तुमच्यापैकी एक विराजमान झालेला दिसेल.
बाबांचे हे शब्द कानी पडताच मी बाबांच्या जयजयकारा च्या घोषणा देऊ लागलो. तेव्हा मित्रांनी मला गदगदा हलवून झोपेतून जागे केले. त्यावेळी मी मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात होतो.
बाबासाहेबांच्या चरणस्पर्श लाभलेल्या पुण्यभूमितच असे स्वप्न पडणे माझे सहाजिक आहे. असं म्हणतात की, पुण्यभूमी त पडलेली स्वप्नं खरी ठरतात.

 

अरूण निकम. 9323249487.
      मुंबई.  

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या