देश प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानासारखे कार्यक्रमाची आवश्यकता आहे. – भास्करराव पा. खतगावकर 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
    रझाकारांच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली त्या हुतात्म्यांतील पहीले हुतात्मे गोविंदराव पानसरे यांचे बिलोली तालुक्यात असलेले स्मारक हे तालुक्याचे भुषण आहे. तरूण पिढीच्या मनात देश प्रेमाची भावना निर्माण होऊन स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांच्या कार्याची जाणीव होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसदारांच्या सत्कार सोहळ्या सारख्या कार्यक्रमांची आवशकता आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री भास्करराव पा. खतगावकर यांनी केले. 

  ते दि. २६ सप्टेंबर रोजी बिलोली तालुक्यातील अर्जापुर येथे पानसरे महाविद्यालय व मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सव समिती बिलोली यांच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या वारसांचा सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ पा. सावळीकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प सदस्य लक्ष्मण ठक्करवाड ,सुभाष गायकवाड, माजी सभापती सुभाष पा. चिचांळकर, संस्थेचे सचिव सुनिल बेजगमवार, जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर आदींची उपस्थिती होती.
खतगावकर पुढे म्हणाले की, श्री गोविंद मुंडकर हे सीमा भागातील विकासासाठी शासन आणि प्रशासनाकडे विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नरत आहेत. महाराष्ट्र शासनास या निमित्ताने सांगू इच्छितो की, मराठवाडा हा महाराष्ट्रात सहभागी होत असताना बिनशर्थ अर्थात विनाअट सहभागी झालेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात गोविंदराव पानसरे यासह सर्व हुतात्म्यांचे मोठे योगदान आहे.
स्वामी रामानंद तीर्थ व हु. गोविंदराव पानसरे यांच्या प्रतिमांचे पुजन व दिप प्रजल्वनाने या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर गोपाळसिंह चौव्हाण, विठ्ठलराव धात्रक, रामचंद्र धात्रक, गंगाराम येडेकर, भाऊराव कदम, उद्धवराव माधवराव मेडेकर, दिगंबर चव्हाण,कुशोभा किणीकर, जळबा साळुंके,शंकर साळुंके या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाॅल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर माजी मंत्री भास्करराव पा. खतगावकर,मा.जि.प सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, नागनाथ पा. सावळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मनोगताच्या कार्यक्रमानंतर अर्धापूर, सगरोळी व पानसरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती पर गितांसह लेझीम पथकाने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरामे,राजु लाभशेटवार,सिद्धोधन कांबळे,प्रा.बैलके यांच्यासह महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपाळ चौधरी यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या