गंगनबीड महादेवास श्रावण सोमवार निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शिंगणापूर प्रति स्वरूप समजल्या जाणाऱ्या स्वयंभू पुरातन कालीन शिवपार्वती एकत्र असलेल्या गंगनबीड महादेव येथे दुसऱ्या श्रावण महिन्याच्या सोमवारी भाविकानी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नांदेड ते हैदराबाद महामार्गावर असलेल्या कुंटूर फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य असलेल्या पहाडावर वसलेल गंगनबीड देवस्थान सर्वांना परिचित आहे.

 

जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या शिंगणापूर महादेव प्रतिरूप समजले जाणा-या गंगनबीड देवस्थानाचा कायापालट व जिर्णोद्धार तालुक्याचे भाग्यविधाते कै बळवंतरावजी चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह प्रमुख प्रतिनिधीच्या प्रयत्नातून करण्यात आला.
सोमवारी गंगनबीड महादेवाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीच्या बारा वाजल्यानंतर आसपासच्या असंख्य गावातून भाविकांना रिमझिम पावसातच पायी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
खासदार, आमदार व प्रशासनाच्या निधीतून रस्त्याच्या कामांसह विविध बांधकामांमध्ये प्रशासकीय अधिकारी व गुत्तेदारांच्या संगनमताने बोगस कामे करण्यात आल्याने तसेच खड्ड्याच्या रस्त्यावरून भाविकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
तसेच महादेवाच्या अभिषेक व दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मंदिर प्रशासनाच्या वतीने गैरसोय केल्याने व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे भाविकात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.  मंदिराच्या परिसरात विविध प्रसादाचे खेळण्याचे फुलाचे दुकाने थाटल्यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या