ग्लोबल कोविड सेंटरमधील 46 डॉक्टरांना कमी करणार !

 “गरज सरो अन् वैद्य मरो”अशी ठा.म.पा.ची नीती- शानू पठाण !
( ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते )
कोरोनाचा कहर माजलेला असताना जीवावर उदार होऊन सेवा बजावणार्‍या सुमारे 46 डॉक्टरांना अचानक कमी करण्याचा घाट ठाणे महानगर पालिकेने घातला आहे. त्या पैकी 38 डॉक्टरांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने डॉक्टरांना कामावरुन कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही; गरज सरो आणि वैद्य मरो, ही ठामपाची निती आहे.
या सर्व डॉक्टरांना सेवेत कायम करुन घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार केला असून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधून या डॉक्टरांवरील अन्याय दूर करण्याची विनंती केली आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मनुष्यबळ कमी पडू लागल्यानंतर ठाणे महानगर पालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये बीयूएमएस डॉक्टरांना तैनात करण्यात आले होते. सुमारे 60 हजारांपासून सव्वा लाखांपर्यंतची वेतनश्रेणी पालिकेकडून देण्यात येत होती. अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये या डॉक्टर्संनी काम केले होते. त्यामध्ये अनेक डॉक्टरांना तर कोरोनाचीही लागण झाली होती. मात्र, रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर या डॉक्टरांना कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. या डॉक्टरांनी आज शानू पठाण यांची भेट घेतली. त्यावेळी पठाण यांनी हा अन्याय सहन करणार नसल्याचे सांगितले.
शानू पठाण यांनी सांगितले की, ज्या वेळी ठाणे पालिकेला गरज होती. त्यावेळी या डॉक्टरांचा वापर करुन घेतला. आता त्यांना वार्‍यावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. बीयूएमससह ज्या डॉक्टरांनी कोविड काळात ठाणेकर नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस केला. त्यांना अशा पद्धतीने वार्‍यावर सोडणे म्हणजे उपकाराची परतफेड अपकाराने करण्यासारखेच आहे. त्यामुळे अशा सर्व डॉक्टरांना ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करुन घ्यावे. कौसा येथील नवीन रुग्णालयात त्यांची नियुक्ती करावी; अन्यथा, पालिकेच्या गेटवरच आम्ही आंदोलनाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या