लोह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसास नाम फाऊंडेशनची आर्थिक मदत !

[ विशेष प्रतिनिधि – रियाज पठान ]
राज्यात नाम फाऊंडेशन ने वेगळी ओळख निर्माण करत शेतकऱ्यांना खचून न जाता नव्या जोमाने व उमेदीने येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत जगण्याची नवी ऊर्जा, उमेद निर्माण करण्याचे काम नाम कडून राज्यभरात करण्यात येत आहे. त्यानुषंगाने बुधवारी दुपारी लोहा तालुक्यातील २१ पैकी १४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना २५ हजार रुपयांचा धनादेश नाम फाऊंडेशन कडून वाटप करण्यात आला.
प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून सन २०१५ पासून राज्यभरात शेतीच्या नापिकिने कंटाळलेल्या तसेच बँक आणि खाजगी सावकारी कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. अशा शेतकरी कुटुंबांना आधार म्हणून नाम फाऊंडेशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसास आर्थिक मदत पुरवते. विशेष म्हणजे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे नाम फाऊंडेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने नापिकी, कर्जबरिपणामुळे न खचता धिरोदत्तपणे आलेल्या संकटाचा सामना करून परिस्थितीशी दोन हात करण्याची हिम्मत ठेवा असे वारंवार सांगत असतात.
शहरातील शासकीय विश्रामगृहात दि. ९ रोजी बुधवारी दुपारी धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमास नाम फाऊंडेशन चे जिल्हा संघटक तथा दै. गोदातीर समाचार चे मुख्य संपादक केशव घोणसे पाटील यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील २१ पैकी १४ नपिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा वारसांना नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
यावेळी गोदातीर चे व्यवस्थापक रामदास पांचाळ, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्याम पाटील नळगे, जि. प.चे सहशिक्षक फारुक शेख, पत्रकार शिवाजी पांचाळ, रत्नाकर महाबळे, इमाम लदाफ, प्रदीप कांबळे आदींसह तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारस व नागरिक बहुसंख्य उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या