गरुड झेप घेणारा अवलिया खेळाडू “हेमंत भाऊ पयेर” !

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)
वयाच्या 21 व्या वर्षीच जिल्ह्याचा मनाचा समजला जाणारा पुरस्कार आणि तोही क्रीडा क्षेत्रात ‘रायगड भूषण पुरस्कार’ पटकवणारा “हेमंतभाऊ पयेर” हे म्हसळा तालुक्यातील पहिले मानकरी ठरले आणि म्हसळा तालुक्याला एक नवीन ओळख मिळाली.
हेमंतने घराचं, तालुक्याचं नाव जगाच्या नकाशावर घेऊन जाण्यास याआधीच सुरुवात केली होती. खेळाबरोबर कला,साहित्य,सहकार,पत्रकार अशा विविध क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परंतु एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून यांनी तालुका ते विविध देशांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करून एक वेगळीच छाप सोडली आहे.

योग,तलवारबाजी,वूडबॉल,बॉक्सिंग,रिंग टेनिस अशा विविध खेळाची आवड स्वतः जोपासली आणि तळागाळातील मुलांपर्यंत या नवीन खेळाची ओळख व व्यासपीठ उभे करून दिले.
क्षेत्र सिद्धगिरी मठ कोल्हापूर,यांच्या माध्यमातून योगाचार्य प्रशिक्षण पूर्ण करून म्हसळा,श्रीवर्धन, माणगाव, मुरुड, तळा,मुंबई इत्यादी ठिकाणी योगाची यशस्वीपणे शिबिरे घेतली.
सन 2009 मध्ये रायगड जिल्ह्यात प्रथमच निशु:ल्क योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यात ग्रामीण भागातील हजारो लोकांनी सहभाग घेतला होता.
सन 2010 मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेचे मॉरिशस येथे नेतृत्व केले.असे योग शिबिरांच्या आयोजनात ते वेळोवेळी आपले योगदान देत आहेत.
जिल्हा योग संघटना,सॉफ्ट टेनिस संघटना,तालुका क्रिकेट असोसिएशन तसेच अनेक राष्ट्रीय, राज्य स्तरावरील क्रीडा संघटनांचे प्रभावी कार्य ते पार पाडत आहेत.
या कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 15 ऑगस्ट 2011 साली विशेष पुरस्काराने हेमंतभाऊंना सन्मानित केले होते.
‘वूडबॉल’ ह्या क्रीडा क्षेत्रात दाखल झालेल्या नवीन खेळाची ओळख व प्रशिक्षण स्वर्गीय संतोष गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रशिक्षण व सरावासाठी हेमंत हे रोज म्हसळा ते नागोठणे असा 8 तासांचा प्रवास करत .त्यांच्या या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना वूडबॉल राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. त्यांनी अनेक स्पर्धांमधून भारताचे नेतृत्व केले.
सन 2011 मध्ये आशिया कप वूडबॉल, मलेशिया; 2012 मध्ये एशियन बीच गेम्स, चीन; 2018 मध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी वूडबॉल स्पर्धा,मलेशिया आणि वूडबॉल वर्ल्ड कपचे आयलँड येथे नेतृत्व केले. तसेच सन 2019 मध्ये वूडबॉल बीच वर्ल्ड कप ची युगांडा येथे कामगिरी बजावली.
ग्रामीण भागातील तरुणांना एकत्र आणून सुशिक्षित बेरोजगार सहकारी संघटनेची उभारणी करून तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
त्यांच्या या कार्यात आई-वडील आणि पूर्ण कुटुंब पाठीशी खंबीरपणे उभे आहे. खेळाकडे कल असला तरी त्यांनी आपले शिक्षणालाही तितकेच महत्त्व देत M.P.Ed पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे P. HD करण्याचा तसेच क्रीडा क्षेत्रात घेतलेला वसा पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा मानस आहे.
हेमंत यांना महाराष्ट् शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानीत केल्यास क्रीडा क्षेत्राला न्याय मिळाला असे वाटते. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला तमाम क्रीडा प्रेमी नागरिकांचा सलाम..

ताज्या बातम्या