स्वतःचे यकृतदान करून मुलाने दिले वडिलांना जीवनदान.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
वडील आणि मुलांच्या नात्यात रोजच दुरावा वाढत असणाऱ्या काळात,नांदेडमधील एका तरुणाने संपूर्ण समाजापुढे एक आदर्श उभा केले आहे.स्वतः एमबीबीएस डॉक्टर असलेल्या या तरुणाने आपल्या आजारी वडिलांसाठी आपले यकृत दान करून त्यांना जीवदान दिले आहे.
नांदेड येथील रहिवासी असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारतळा येथे कार्यरत असलेले सहशिक्षक श्री.गोविंद गव्हाणे यांना काही दिवसांपूर्वी यकृताचा त्रास अचानक उद्भवल्याने त्यांना नारायणा हॉस्पिटल नांदेड येथे दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी पोटविकार तज्ञ डॉ.कैलास कोल्हे यांनी योग्य ते उपचार करून त्यांना हैद्राबाद येथे त्वरित हलवण्याचा सल्ला दिला. हैद्राबाद येथील ए .आय. जी हॉस्पिटल येथील यकृत शल्य चिकित्सक डॉ.बालचंद्र मेनॉन, डॉ.सुमना कोलार व त्यांच्या टीमने त्यांची तपासणी करून यकृत पूर्णतः खराब झालेले आहे,त्वरित यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला त्यांना दिला. ज्यावेळी ही बातमी त्यांचे सुपुत्र डॉ.मयुरेश गोविंद गव्हाणे यांना कळली तेव्हा त्यांनी लागलीच दिल्लीवरून हैद्राबाद गाठले. डॉक्टर मयुरेश यांनी २०२० साली शासकिय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथुन एमबीबीएस पूर्ण केले होते आणि काही दिवसांपासून ते दिल्लीत UPSC ची तयारी करत आहेत.
ज्यावेळी त्यांना वडिलांच्या आजाराबद्दल माहिती मिळाली, तेव्हा क्षणाचा ही विलंब न करता स्वतःचे यकृत वडिलांसाठी देण्यास हा २६ वर्षांचा तरुण तयार झाला. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर दिनांक २५ जुलै रोजी तब्बल बारा तास ही संपूर्ण प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या शस्त्रक्रियेत मुलाचे सत्तर टक्के यकृत हे वडिलांना प्रत्यारोपण करण्यात आले.
आजच्या या युगात आई-वडिलांना सुश्रुषा न करणारे मुले आपणास पाहायला मिळतात. उच्चशिक्षित, विद्या विभूषित मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमाकडे पाठवताना पहावयास मिळते पण या 21 व्या युगात श्रावणबाळासारखे एक पुत्र आपणास क्वचितच पाहण्यास मिळतात.डॉ.मयुरेश गोविंद गव्हाणे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरावरून कौतुक व लवकर बरे व्हावे यासाठी प्रेमरूपी आशीर्वाद सर्व देत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या