विविध मागण्यांसाठी माविकसंचे दिनांक ०३ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

नांदेड प्रतिनिधी :

     वीज कंपनीतील मयत कामगारांच्या वारसांना त्वरीत नौकरीत सामाउन घेणे तसेच अन्य मागण्यांसाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे झोन अध्यक्ष भाई प्रकाश वागरे आणि पदाधिकारी येत्या दिनांक ०३ नोव्हेंबरपासून विद्युत भवन कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

झोन अध्यक्ष भाई प्रकाश वागरे यांनी महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात वरील इशारा देण्यात आला आहे. मयत कामगारांचा वारस असलेल्या अंगुलीमाला मरीबा गजभारे यांना नोकरीचा प्रस्ताव विलंब झाल्याचे कारण सांगून वरिष्ठ कार्यालयाचा सल्ला न घेता फेटाळण्यात आला आहे. नांदेड परिमंडळाचा हा निर्णय अतिशय अन्यायकारक असून अंगुलीमाला गजभारे यांना त्वरीत नौकरीवर सामाऊन घ्यावे अशी मागणी माविकसंने केली आहे.

या शिवाय अश्विनी पल्लेवाड, पवन कंठाळे, प्रतिक्षा कंधारे, बुध्दभुषण खाडे या वारसांना देखील वीज वितरण कंपनीने त्वरीत नोकरीत सामाऊन घ्यावे अशीही माविकसंची मागणी आहे. औरंगाबादचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद क्षीरसागर यांच्याकडून नियमबाह्य पध्दतीने घरभाडे कपात केले आहे, ती रक्कम त्यांना त्वरीत परत करावी. संदिप इंगोले व बळीराम गि-हे यांचे बऱ्याच वर्षापासूनचे प्रलंबित वैद्यकीय बील त्वरीत द्यावे. राजु कांबळे यांना नियमबाह्य लावलेला दंड परत करावा अशीही माविकसंची मागणी आहे. पूर्णा येथील सहाय्यक अभियंता राहूल घोडके तसेच शिल्पा वाघमारे, कल्पना वडमोरे, श्रीमती व्ही.सी. रावणगावकर, चंद्रप्रकाश हिंगोले, धिरत पवार यांच्यासह पंधरा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या सप्टेंबर महिन्यात बाहेरच्या विभागातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या आधी केल्या असत्या, तर या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला नसता असे भाई वागरे म्हणाले.

तरी या सर्वांच्या बदल्या त्यांच्या विनंती अर्जानुसार कराव्यात अशी देखील मागणी माविकसंने केली आहे. याच मागण्यांसाठी माविकसंने कंपनीकडे आतापर्यंत चारवेळा निवेदन दिले आहे. आता या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास ०३ नोव्हेंबरपासून भाई प्रकाश वागरे यांच्यासह पदाधिकारी देखील आमरण उपोषण करणार आहेत.

ताज्या बातम्या