पुढील पाच वर्ष मतदारांची सेवा करण्याचा संकल्प : आदिवासी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचा जाहिर सत्कार
[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
जिल्हा नांदेड. चंद्रपूर, दि. 11: राणी दुर्गावतीचे शौर्य व सेवेची आठवण करण्याचा हा दिवस आहे. राणी दुर्गावतीने राज्य चालविण्यासाठी जनकल्याणकारी योजना राबविल्या.महायुती सरकारने याच आदर्शांवर आदिवासी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला. आदिवासींना आता त्यांच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. आदिवासी समाजातील गरीब कुटुंबांना घर देण्याचा निर्णय, तसेच 12 हजार 500 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावामध्ये गोटूलला मंजुरी दिली. आदिवासींच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असून आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील,अशी ग्वाही आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा येथे आदिवासी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे संघटक जगन येलके, माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, हरीश ढवस, गणेश परचाके, प्रेमदास इस्टाम, प्रवीण पेंदोर, विजय आत्राम, मधुकर कुळमेथे, कांताबाई मडावी, विनोद देशमुख, ईश्वर नैताम, ऋषी कोटरंगे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सिंचन,आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात लक्ष देण्यात येत असून विशेष करून विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे जावा यासाठी नाविन्यपूर्ण योजना आखण्यात येत आहे. पोंभुर्ण्याचा कायापालट व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशिल आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल. मुल येथे पॉलीटेक्निक कॉलेज तसेच 40 हजार कोटीची गुंतवणूक करून पोंभुर्णा एमआयडीसीतील उद्योग, शेती, आरोग्य अशा महत्त्वपूर्ण पाच प्रमुख मुद्द्यांवर काम सुरू करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षे पुन्हा मतदारांची सेवा करण्याचा संकल्प आहे. मतदार अडचणीत असल्यास मतदारांना मदतीचा हात आपला असावा या भावनेतून काम करण्यात येत असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
●● मतदारांचे मानले आभार ●●
पोंभुर्णावासियांनी प्रेमाने स्वागत आणि सत्कार केला. हे प्रेम पुढचे पाच वर्ष या मतदारसंघाची मनापासून सेवा करण्यासाठीची शक्ती आहे. मतदार हा ईश्वराचा अंश आहे . जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याने बल्लारपूर मतदारसंघातील जनतेने मला 25 हजार 985 मतांनी निवडून दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
●● लाडक्या बहिणीची साथ ●●
विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींमध्ये सर्वात जास्त ऊर्जा पाहायला मिळाली. महायुतीच्या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा असल्याचे नमूद करत लाडक्या बहिणींच्या पाठीशी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कायम उभा राहील अशी ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी दिली. जगन येलके, गणेश परचाके व त्यांच्या टीमला विशेष करून आ. मुनगंटीवार यांनी धन्यवाद दिले. याच मैदानावर समर्थन व पाठिंबा देत मला निवडून आणण्यासाठी शक्ती पणाला लावली. येथील भाजपा नेते, कार्यकर्ते आणि मतदारांनी या निवडणुकीत स्वतःच उमेदवार आहे या भावनेने निवडणुकीच्या युद्धामध्ये पूर्ण शक्तीनिशी काम केले व मला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टी, पोंभुर्णाच्या वतीने विजयी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. जनतेच्या मतरुपी आशिर्वादाने विजय मिळवून दिला. त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे आ.मुनगंटीवार यांनी मनापासून आभार मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy