यकृतदान केलेल्या मुलाचा, स्वातंत्र्यदिनी जिल्हाअधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
   वडील आणि मुलांच्या नात्यात रोजच दुरावा वाढत असणाऱ्या काळात नांदेडमधील एका तरुणाने संपूर्ण समाजापुढे एक उदाहरण तयार केले आहे. स्वतः एमबीबीएस डॉक्टर असलेल्या या तरुणाने आपल्या आजारी वडिलांसाठी आपले यकृत दान करून त्यांना जीवदान दिले आहे.नांदेड येथील रहिवासी असणारे सहशिक्षक श्री.गोविंद गव्हाणे यांना काही दिवसांपूर्वी यकृताचा त्रास अचानक उद्भवल्याने त्यांना नारायणा हॉस्पिटल नांदेड येथे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी पोटविकार तज्ञ डॉ.कैलास कोल्हे यांनी योग्य ते उपचार करून त्यांना हैद्राबाद येथे त्वरित हलवण्याचा सल्ला दिला.

            हैद्राबाद येथील ए .आय. जी हॉस्पिटल येथील यकृत शल्य चिकित्सक डॉ.बालचंद्र मेनॉन, डॉ.सुमना कोलार व त्यांच्या टीमने त्यांची तपासणी करून यकृत पूर्णतः खराब झालेले आहे,त्वरित यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला त्यांना दिला. ज्यावेळी ही बातमी त्यांचे सुपुत्र डॉ.मयुरेश गोविंद गव्हाणे यांना कळली तेव्हा त्यांनी लागलीच दिल्लीवरून हैद्राबाद गाठले. डॉ.मयुरेश यांनी २०२० साली शासकिय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथुन एमबीबीएस पूर्ण केले होते आणि काही दिवसांपासून ते दिल्लीत UPSC ची तयारी करत आहेत.
ज्यावेळी त्यांना वडिलांच्या आजाराबद्दल माहिती मिळाली, तेव्हा क्षणाचा ही विलंब न करता स्वतःचे यकृत वडिलांसाठी देण्यास हा २६ वर्षांचा तरुण तयार झाला. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर दिनांक २५ जुलै रोजी तब्बल बारा तास ही संपूर्ण प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या शस्त्रक्रियेत मुलाचे सत्तर टक्के यकृत हे वडिलांना प्रत्यारोपण करण्यात आले. आजच्या या युगात आई-वडिलांना सुश्रुषा न करणारे मुले आपणास पाहायला मिळतात. उच्चशिक्षित, विद्या विभूषित मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमाकडे पाठवताना पहावयास मिळते पण या 21 व्या युगात श्रावणबाळासारखे एक पुत्र आपणास क्वचितच पाहण्यास मिळतात.डॉ.मयुरेश गोविंद गव्हाणे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
         त्यांचे हे कार्य अवयवदानाच्या चळवळीस प्रोत्साहन देणारी आहे,अशाप्रकारे अवयव दान करून डॉ . मयुरेश यांनी एक मुलगा म्हणून आपले कर्तव्य उत्कृष्ट पार पाडले, या कार्याबद्दल श्री.अभिजीत राऊत (भा.प्र.से) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 76 व्या स्वातंत्र्यदिनी त्याची मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या या प्रशंसनीय कार्याबद्दल त्याला सन्मानपत्र प्रदान केले .यावेळी उपस्थित शशिकांत महावरकर विशेष पोलिस उपमहानिरिक्षक,नांदेड परिक्षेत्र, श्रीमती मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा पोलिस अधिक्षक, श्री महेशकुमार डोईफोडे आयुक्त,नांदेड वाघाळा महानगरपालिका,श्री पी. एस. बोरगावकर अपर जिल्हाधिकारी, नांदेड आदीं मान्यवर उपस्थित होते.डॉ. मयुरेश गव्हाणे हे प्रकृतीच्या कारणामुळे सन्मान समारंभास उपस्थितीत राहू शकले नाही, तथापि यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधू डॉ. नरेश बोधनकर व नांदेड येथील सुप्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. कैलास कोल्हे यांनी हा सन्मान स्वीकारला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या