लाठ खु.ता.कंधार येथे जागतिक मृदा दिन साजरा ; नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार यांची उपस्थिती

लाठ खु.ता.कंधार येथे संस्कृती संवर्धन मंडळ ,कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रंजनाताई कऊटकर होते व प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकचे नांदेड जिल्ह्या विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार,कृषी विज्ञान केंद्र सगरोळी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.माधुरी रेवणवार , स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे समन्वयिका रेवती कानगुले यांची उपस्थिती होती. 

लाठ खु.तालुका कंधार येथे नाबार्ड च्या अर्थसहाय्यातून हवामान बदल अनुकूल प्रकल्प प्रगतीपथावर आहे.या मृदादिनानिमित्य नाबार्डच्या माध्यमातून गावातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्यांकरिता नेतृत्व विकास मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावर यांनी मृदेच संवर्धन ,संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांच संरक्षण होत असून जगातील 95 टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येत.या मृदेत अनेक सजीव आसरा घेतात. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेच महत्व अनन्यसाधारण आहे. शेतकऱ्यांसोबत सामान्य माणसांमध्येहि मृदेसंबंधी जागरूकता करण्याचा उद्देश या जागतिक मृदादिन साजरा करण्यामागचा आहे. या वर्षीच्या मृदा दिवसाची संकल्पना आहे . “ माती : ज्या ठिकाणी अन्नसाखळीच्या सुरुवात होते ”. रासायनिक खते आणि किटकनाशकांचा बेसुमार वापर जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत.त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे,मातीच्या प्रदुषणात वाढ होत आहे . केवळ एक इंच सुपीक मृदेच थर तयार होण्यासाठी आठशे ते हजार वर्षाचा कालावधी लागतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मृदा संवर्धन करणे हि काळाची गरज आहे ,याची जाणीव करून कृती करायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले. 

लाठ खु.येथे नाबार्डच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या इंडो जर्मन पाणलोट प्रकल्पामुळे भूगर्भपाणी पातळीत वाढ झाली,हवामान बदल अनुकूल प्रकल्पामुळे पीकपद्धतीत बदल झाला. भाजीपाला बिजोत्पादन पासून गावचे आर्थीक सक्षमीकरण झाले.यापुढेही गावकऱ्यांनी माती व पाणी संवर्धन साठी अखंडपणे काम करावे,सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर करावा,रासायनिक सोबतच जैविक खताचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.बचत गटातील महिलांना गटामार्फत करावयाचे उद्योग ,विविध प्रशिक्षण ,आदी साठी आवश्यकतेनुसार नाबार्डशी संपर्क करा असे त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले.
डॉ.माधुरी रेवणवार यांनी जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे महत्व सांगून जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा द्यावी असा सल्ला दिला.जमिनीचा पीएच व सेंद्रिय कर्ब व जमिनीतील जीवाणू साखळीचा कसा संबंध आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. रासायनिक खते व पाण्याचा अनिर्बंध वापर.सेंद्रिय खताचा वापर आदी कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे असून जैविक खत.गांडूळ खत ,जीवामृत ,दशपर्णी आदीचा वापर शेतकऱ्यांनी वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या महिलांना त्यांनी गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाकडे वळावे यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र तयार असल्याचे सांगितले. 
ग्रामीण महिला पारंपारिक तंत्रज्ञानामधे अडकल्याने त्यांना नवीन तंत्रज्ञान तसेच उद्योगाचा अवलंब करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होत नाहीत.व्यवसाय करण्याबाबतच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे महिलांना उद्योजक बनण्यात अडथळे येतात.आहार आणि आरोग्याबाबतही ग्रामीण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या चालीरीती- अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. महिलांना एखादा उद्योग करावयाचा किंवा एखादे तंत्रज्ञान वापरायचे वाटले तरी त्यसाठी त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता कमी असते.यासर्व बाबीचा विचार करता महिलांना संघटीत होऊन अन्नप्रक्रिया ,कृषी पूरक व्यवसायामध्ये सहभाग वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे समन्वयिका रेवती कानगुले यांनी महिला उद्योग व्यवसाय विषयी माहिती दिली.स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेकडून प्रगतीपथावर असलेल्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.
प्रगतीशील शेतकरी संतोष गवारे यांनी मिरची व टोमॅटो बिजोत्पादन संदर्भात माहिती दिली.
याप्रसंगी बळीराजा पाणलोट समितीचे अध्यक्ष संजय घोरबांड ,रणजीत घोरबांड ,शंकरगिरी ,संतोष गवारे ,शिवाजी इंगोले,रामकिशन घोरबांड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्ती जोगपेटे यांनी व उपस्थितांचे आभार गंगामणी अंबे यांनी मानले. या कार्यक्रमाला बळीराजा पाणलोट समितीचे व वैरागी महाराज शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी महिला बचत गटाचे सदस्य ,शेतकरी महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षाताई जाधव ,अविनाश जोगी,संगमेश्वर शिवशेट्टे ,इर्शाद सय्यद,सचिन बाबळे आदींनी परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या