कालच जयभीम पिक्चर पाहिला. यावर अनेकांनी आपआपली मते मांडली आहेत. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी तेच, तेच पुन्हा लिहणार नाही. पिक्चर खुपच चांगला आहे. म्हणजे पिक्चर अगदी अंगावर येतो. सिनेमामध्ये गाणी नाहीत, फायटिंग नाही, थरारक ॲक्शन वगैरे काहीही नसतानाही सिनेमा डोक्यात जातो. हे विशेष. मला फक्त सिनेमाच्या नावाविषयी मत मांडायचय. या सिनेमाचं जे नाव आहे, तो या सिनेमाचा माझ्या मते जबरदस्त पंच आहे. मी असे म्हणतो ते यासाठी की, सिनेमातील कोणतही पात्र ‘जयभीम’ म्हणत नाही. चंदू वकीलाच्या डोक्यावर मार्क्सचा फोटो आहे, बाबासाहेबांचा नाही. झेंडेसुध्दा लाल आहेत. कोठेही निळा झेंडा दिसत नाही. फक्त एका डायलॉगमध्ये आंबेडकरांचा उल्लेख येतो. तेवढाच. बाकी सगळं विळ्या हातोड्यासहीत सगळं लालम लाल. या पार्श्वभूमीवर सिनेमाचं नाव ‘लाल सलाम’ ठेवलं असतं तरी चाललं असतं. पण लेखकाने म्हणा, दिग्दर्शकाने म्हणा किंवा निर्मात्याने म्हणा, या सिनेमाचे नाव जे ‘जयभीम!’ ठेवलं आहे, त्याला खरच दाद द्यावी लागेल. कारण हा सिनेमा कोठेही हिंसेला प्रोत्साहन देत नाही. सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत हा जो वकील आहे तो संवैधानिक पध्दतीने अन्यायाविरोधात लढा देतो आणि जिंकतो.
बाबासाहेबांनी क्रांतीची व्याख्या करताना असं म्हटलय की, रक्ताचा एक थेंबही न सांडता केलेला बदल म्हणजे क्रांती होय. आणि नेमकं हेच हा सिनेमा आपल्याला सांगतो. मला वाटतं बाबासाहेबांना अपेक्षित असणारी ही क्रांती हा सिनेमा अधोरेखित करतो. आणि म्हणूनच या सिनेमाला ‘जयभीम!’ हे नाव सार्थ वाटतं. नाहीतर आपल्याकडे उठल्या सुटल्या डफली हातात घेऊन हत्यार शोधणारे रक्तरंजित क्रांतिकारक भरपूर सापडतील. अशा तथाकथित क्रांतिकारकांनीसुध्दा या सिनेमातून बोध घेतला पाहिजे.
शेवटपर्यंत हा सिनेमा संविधानावर विश्वास ठेवून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा रक्तविहिन लढा लढतो आणि जिंकतो. म्हणूनच या सिनेमाचं ‘जयभीम!’ हे नाव मला यथोचित वाटतं. जयभीम!–
(शब्दांकन – विवेक मोरे)
मी कुणी चित्रपट समीक्षक नाही. एक सर्वसामान्य प्रेक्षक आहे. चित्रपटातलं मला फारसं काही कळतं नाही. पण तरीही आज जय-भीम चित्रपटाविषयी बोलावंसं वाटतंय. आज सकाळी थोडासा वेळ घालवायचा म्हणून जय-भीम सुरू केला आणि हा संपूर्ण चित्रपट पाहिला . जय-भीम अक्षरशः मेंदूत झिणझिण्या आणत थेट माझ्या ह्रदयात घुसला आहे.
एखाद्या विशेष प्रेक्षक वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून आपल्या चित्रपटाकडे खेचण्यासाठी जय-भीम हे नाव ठेवलं असावं असा जर तुमचा समज किंवा गैरसमज असेल तर तो पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. जो तो आपापल्या बुध्दी प्रमाणे जय-भीम शब्दाचा अर्थ लावतो. पण या चित्रपटात जय-भीम म्हणजे न्याय आणि फक्त न्याय हाच अर्थ आहे.
अन्यायग्रस्त आदिवासी महिला संगिनी पोलिस कमिशनर पुढे स्वाभिमानाने सांगते. मला अपराध्यांकडून पैसे नकोत. फक्त न्याय पाहिजे. चित्रपटातील या प्रसंगात संगिनी इतकं साधं सरळ सहज बोलते की तिची न्यायाची मागणी मन हेलावून टाकते. अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा वकील चंद्रु जबरदस्त व्यक्तीरेखा आहे. ॲड.चंद्रु चे आदर्श कार्ल मार्क्स, पेरियार रामास्वामी, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. या महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन तो काम करतोय. अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रु सतत प्रयत्नशील आहे. चित्रपटात शेवटी ॲड. चंद्रु न्यायालयीन लढाई जिंकतो. त्याचे डोळे संगिनीला शोधत असतात. गरोदर संगिनी तिच्या सात वर्षांच्या लहान मुली सोबत भर पावसात न्यायालयाच्या बाहेर न्यायाची वाट पहात बसलेली असते.
ॲड.चंद्रुने संगिनीला न्याय मिळवून दिला.पण तरीही चित्रपट अपूर्ण आहे. कारण जो पर्यंत समाजात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मुल्ये प्रस्थापित होतं नाहीत तोपर्यंत हा संघर्ष करावाच लागणार आहे. नक्की खात्री नाही. पण संपूर्ण चित्रपटात जय-भीम हा शब्द एकदाही वापरला नाही. तरीही चित्रपटाचं टायटल जय-भीम आहे.
विनंती आहे खरोखरच एक वास्तववादी जबरदस्त चित्रपट पहाण्याची संधी सोडू नका. चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर उपलब्ध आहे. खाली लिंक दिली आहे फोटोवर क्लिक करा.तुम्ही नक्की पहा. #जय_भीम ( शब्दांकन – संतोष बी. झावरे )
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy