कल्याण टोल मार्फत बेसुमार मुरूमाचे उत्खनन, महसूल विभागाचा अजब कारभार ; 500 ब्रास उत्खनन करण्यासाठी वीस दिवसाची परवानगी !

                 • महसूल प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी ते धर्माबाद राज्य महामार्गाचे काम सुरू असून या कामाकरिता महसूल प्रशासनाने कल्याण टोल या कंपनीला गौण खनिज मुरूम 500 ब्रास उत्खनन करण्याची परवानगी दिली. या कंपनीकडून दररोज हजारो ब्रास बेसुमार मुरुमाचे उत्खनन करण्यात येत आहे,आशा गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे.

कुंडलवाडी ते धर्माबाद राज्यमार्ग महामार्गाचे काम चालू असून या कामाकरिता महसूल प्रशासनाने बिलोली येथील गट क्रमांक 165 (ब) या शिवारातून कल्याण टोल कंपनी मार्फत रामेश्वर संतोष पांडे या इसमास दिनांक 7 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2021 पर्यंत 500 ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी दिली आहे. सदरील कालावधी पाहता वीस दिवसासाठी फक्त 500 ब्रास उत्खनन करण्याची परवानगी देऊन महसूल प्रशासनाने आपल्या अजब कारभाराची प्रचिती दिली आहे.असे असले तरी या ठेकेदाराने शासनाने ठरवून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवत 6 ब्रासच्या हायवा गाड्याने दररोज हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करीत आहे. अशा गंभीर बाबीकडे महसूल प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसत, कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे. अशा ठेकेदाराला पाठीशी घालून,शासनाचे महसूल बुडवू घालणाऱ्या संबंधित महसूल प्रशासकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिक करीत आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या