कुंडलवाडी शहरातील जक्कीन तलाव परिसरातील शेतात पाणी साचल्याने शेतीचे मोठे नुकसान !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
◆ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी .
◆ महसूल व लघुपाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची मागणी .

कुंडलवाडी शहराजवळील असलेल्या जक्कीन तलाव सध्या पुर्ण क्षमतेने भरला आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाल्याने तलावाबाहेर पाणी जाण्याचे मार्ग पुर्णतः बंद पडले आहेत. त्यामुळे तलावातील पाणी लगतच्या असलेल्या शेतात शिरल्याने शेती पुर्णतः जलमय झाली असल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याकडे बिलोली तहसील प्रशासन व लघु पाटबंधारे विभाग, नायगाव यांनी लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधुन होत आहे. शहर व परिसरात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यानंतर आँगस्ट महिन्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात गत चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराजवळ असलेला जक्कीन तलाव १०० टक्के भरला आहे.जक्कीन तलाव पुर्ण भरल्यानंतर तलावातील पाणी जाण्यासाठी तलावाच्या एका बाजुस पाईप टाकण्यात आले आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तसेच पाणी जाण्यासाठी पाईपामध्येही गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याने पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
पावसाने जक्कीन तलाव पुर्ण भरला असुन तलावाच्या साठवण क्षमतेपेक्षाही जास्त झाल्याने तलाव भविष्यात फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद असल्याने लगतच्या शेतामध्ये तलावातील पाणी शिरल्याने शेती पुर्णतः जलमय झाली असुन शेकडो एकर शेती बाधित झाली आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तलावातील पाणी शिरल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पंचनामे करावेत व भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी अंकिता सयाराम नरावाड, किशन बिरमवार, गंगन्ना सैदन्ना बिरमवार, गोविंद हुस्सेकर, नागेश गट्टुवार, विठ्ठल बिरमवार, कविता बिरमवार, शंकर बिरमवार, दादाराव गुंडेराव, गंगन्ना मुक्केरवार, सायलू मुक्केरवार आदी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
जक्कीन तलाव परिसरातील बाधित शेतीची दि.१३ सप्टेंबर रोजी सोसायटीचे माजी चेअरमन सयाराम नरावाड,पानसरे महाविद्यालयाचे संचालक नरेश सब्बनवार, माजी नगरसेवक सुरेश कोंडावार, साईनाथ दाचावार, पोशट्टी नागुलवार, माजी नगरसेवक सयाराम नामतेष आदींनी पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या