◆ चेअरमन सुनील बेजगमवार, माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, यांच्या पाठपुरावाला यश !
[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अंतर्गत ४० वर्षापासून उपसा जलसिंचन योजनेच्या ५६९ शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या सातबारा कर्ज होते.उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित तर झालीच नाही उलट शेतकऱ्यांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार,माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, यांनी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या कडे व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे ५६९ शेतकऱ्यांची उपसा जलसिंचनयोजनेचे कर्जमाफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दि.१६ मार्च रोजी झालेल्या बैठकीत केला आहे.
कुंडलवाडी सोसायटीच्या माध्यमातून १९८५ साली सभासदांच्या शेतजमिनीच्या सिंचनासाठी कुंडलवाडी,शेळगाव,चन्नापुर व पाटोदा,माष्टी या गावातील शेतकऱ्यांसाठी दोन उपसा जलसिंचन योजनेचे काम सुरू केले.यासाठी कुंडलवाडी,शेळगाव,चन्नापूर या योजनेसाठी १ कोटी ९ लाख २५ हजार ७७५ व पाटोदा, माष्टी या योजनेसाठी ९६ लाख २ हजार असे एकुण २ कोटी ५ लाख २७ हजार ८६८ रुपयांचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा टाकून घेतले होते.सोसायटीने दोन्ही योजनेचे काम सुरू करून १९९४ साली पूर्ण केले.परंतु गोदावरी नदीमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने सदर योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.त्यामुळे सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाचा कणभरही फायदा झाला नसून मुद्दलावर जवळपास सहा ते सात पट व्याज झाले.सदरच्या योजनेतील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाच्या बोजाची नोंद असल्यामुळे त्यांच्या शेतजमिनीची खरेदी विक्री करणे ही यामुळे अशक्य झाले आहे. योजनेतील ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत योजनेतील ५६९ शेतकरी सभासद आहेत.फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी द्वारे सोसायटीच्या जलसिंचन योजनेचे कर्ज माफ करावे अशी मागणी विधिमंडळात आमदारांनी केली होती.
तसेच सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार व माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार यांनी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर,मा.आ.अमरनाथ राजूरकर यांच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांकडे व राज्य शासनाकडे कर्जमाफी होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.दि.१६ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कुंडलवाडी सोसायटीच्या जलसिंचन योजनेचे कर्जमाफी विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. या कामी मंत्रालयातील सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी तथा सगरोळी गावचे भूमिपुत्र अशोक दमय्यावार, जिल्हा उपनिबंधक विश्वासराव देशमुख,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.
◆ कर्जमाफी चा आनंदोत्सव साजरा
गत चाळीस वर्षापासून उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जाखाली असलेल्या ५६९ शेतकऱ्यांचे राज्य शासनाकडून कर्जमाफी झाल्याचा आनंद दि.१७ मार्च रोजी सोसायटी तर्फे डॉ.हेडगेवार चौक व सोसायटी मुख्य कार्यालय प्रांगणात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार, माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, व्हाईस चेअरमन गंगाधर नरावाड, राजेश्वरराव उत्तरवार, दत्तात्रय नरावाड,संजय पाटील शेळगावकर यांच्यासह सोसायटीचे आजी-माजी संचालक शेतकरी सोसायटीचे सभासद,शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy