कुंडलवाडी सोसायटी च्या जलसिंचन योजनेचे कर्ज शासनाने विशेष बाब म्हणून माफ करावे – सुनिल बेजगमवार

◆ नवनिर्वाचित चेअरमन सुनील बेजगमवार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अप्पर सचिवांकडे निवेदनाद्वारे मागणी..
कुंडलवाडी सोसायटीच्या जलसिंचन योजनेचे कर्जमाफीसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. यानंतर दि.७ जून रोजी मंत्रालयात सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना भेटून शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने झालेली कार्यवाहीच्या पुर्ततेच्या अनुषंगाने माहिती अवगत अरण्याची विनंती केली.तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जलसिंचन योजनेच्या कर्जमाफी होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असे सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी सांगितले.
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत असलेल्या उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांचे कर्ज विशेष बाब म्हणून शासनाने माफ करावी अशी मागणी नवनिर्वाचित चेअरमन सुनील बेजगमवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
                कुंडलवाडी सोसायटीच्या माध्यमातून १९८५ साली सभासदांच्या शेतजमिनीच्या सिंचनासाठी कुंडलवाडी,शेळगाव,चन्नापुर व पाटोदा,माष्टी या गावातील शेतकऱ्यांसाठी दोन उपसा जलसिंचन योजनेचे काम सुरू केले.यासाठी कुंडलवाडी,शेळगाव,चन्नापूर या योजनेसाठी १ कोटी ९ लाख २५ हजार ७७५ व पाटोदा, माष्टी या योजनेसाठी ९६ लाख २ हजार असे एकुण २ कोटी ५ लाख २७ हजार ८६८ रुपयांचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा टाकून घेतले होते.सोसायटीने दोन्ही योजनेचे काम सुरू करून १९९४ साली पूर्ण केले.परंतु गोदावरी नदीमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने सदर योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.त्यामुळे सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाचा कणभरही फायदा झाला नसून मुद्दलावर जवळपास सहा ते सात पट व्याज झालेले आहे.सदरच्या योजनेतील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाच्या बोजाची नोंद असल्यामुळे त्यांच्या शेतजमिनीची खरेदी विक्री करणे ही यामुळे अशक्य झाले आहे. योजनेतील ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत योजनेतील ५६९ शेतकरी सभासद आहेत.
                  याबाबत सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात यावर तारांकित प्रश्न मांडण्यात आला होता. तत्कालीन सहकार मंत्र्यांनी कर्जाचे मुद्दल सरकार भरेल व व्याज संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकेने माफ करावे असे आश्वासन दिले होते.पण हे आश्वासन फोल ठरले. फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व आ.जितेश अंतापुरकर सह इतर आमदारांनी लक्षवेधी द्वारे सोसायटीच्या जलसिंचन योजनेचे कर्ज माफ करावे अशी मागणी केली होती. या अनुषंगाने चेअरमन सुनील बेजगमवार यांनी माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात अप्पर सचिव,सहकार पणन यांची भेट घेऊन शासनाने दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने भेट घेतली. व हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात माजी चेअरमन तथा समिती सदस्य सयाराम नरावाड,नरेश सब्बनवार, पत्रकार कुणाल पवारे आदीजण यावेळी उपस्थित होते. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या