कायद्यातील विसंगती दूर होणं आवश्यक आहे – संजय येनपुरे !
(ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते)
एखाद्या खून करणाऱ्या व्यक्तीस अपल्याbदेशात फाशीची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होते पण त्याचवेळी रस्ते अपघातात लोकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्याला मात्र केवळ अडीच वर्षाची शिक्षा होते.कायद्यातील ही विसंगती दूर होणं गरजेचं असून त्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन ठाण्याचे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप समारंभात बोलताना केले.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय वतीने गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या 32 व्या रस्ते सुरक्षा अभियानाचा समारोप समारंभ बुधवारी संपन्न झाला. त्यावेळी अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ठाण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, विश्वांभर शिंदे, हेमांगीनी पाटील, तानाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संजय येनपुरे म्हणाले, परदेशात वयोगटानुसार विविध अश्वशक्तीच्या वाहन चालविण्यास परवानगी दिली जाते. तसाच निकष लागू करण्याची आवश्यकता आहे. यावेळी बोलताना वैदही रानडे म्हणाल्या माझा प्रवास ही माझी जबाबदारी आहे हे ब्रीद पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. मी वाहतुकीचे सर्व नियम पाळीन, वाहतुक पोलीस किंवा परिवहन अधिकारी यांच्याशी हुज्जत घालणार नाही. नियमभंग झाल्यास आवश्यक तो दंड भरेन ही वृत्ती अंगिकरल्यास रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होईल.
यावेळी निबंध स्पर्धेतील विजयी विद्यार्थिनी, कोरोणा महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या आणि रिक्षात विसरलेल्या मौल्यवान वस्तू प्रामाणिक पणे नागरिकांना देणाऱ्या अबोली रिक्षा चालिका आदींना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी केलं तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी आभार मानले.