विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन, पुणेच्या अध्यक्षपदी पुढारी कार्यकर्ते डॉ.भारत पाटणकर यांची एकमताने निवड !

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन,पुणेच्या अध्यक्षपदी पर्यायी सांस्कृतिक मांडणी व कार्यक्रम देणारे, शेतकरी व राबणाऱ्यांचे पुढारी कार्यकर्ते डॉ.भारत पाटणकर यांची एकमताने निवड झाली.
 शिक्षण, राजकारण, स्वातंत्र्यलढा या बरोबरच समाज परिवर्तनाच्या चळवळींना नवीन विचार आणि नेतृत्व जिथून दिलं गेलं त्या पुण्याच्या भूमीमध्ये 10 आणि 11 डिसेंबर रोजी विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलन होत आहे.विद्रोहीच्या आजवरच्या 23 वर्षाच्या वाटचालीत पहिल्यांदाच पुण्यात असं संमेलन होत आहे.
या संमेलनाचे अध्यक्ष कोण असतील अशी उत्सुकता पुरोगामी पक्ष चळवळींमध्ये होती. दरम्यान प्रस्थापित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीत मतभेदांचे दर्शन घडवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर बळीराजा धरणाच्या माध्यमातून समन्यायी पाणी वाटप, पंढरपूरच्या विठ्ठलाला बडव्यांच्या आणि रुक्मिणीला उत्पातांच्या तावडीतून मुक्त करणारी यशस्वी चळवळ राज्यातील धरण आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते, आधी पुनर्वसन मगच प्रकल्प ही घोषणा सरकार धोरण म्हणून स्वीकारेपर्यंतचे यशस्वी लढे केलेले कामगार चळवळतील ज्येष्ठ पुढारी कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांची एक मताने निवड करण्यात आली आहे राष्ट्रसेवा दल पर्वती च्या आवारात येत्या महिन्यात 10 व 11 डिसेंम्बरला हे संमेलन होत आहे. डॉ.पाटणकर यांच्या निवडीबद्दल राज्यभरातून आनंद व अभिनंदन केले जात आहे.
एमबीबीएस या पदवीपर्यंतचे वैद्यकीय शिक्षण डॉक्टर पाटणकर यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले . मात्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असताना वर्गीय जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करून नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणाऱ्या विचार व लढ्याने त्यांना आपल्याकडे ओढले. या लढ्याचे एक नेतृत्व असलेले डॉ.भारत पाटणकर प्रस्थापित ब्राह्मण्यवादी , भांडवली पुरुषसत्ता व्यवस्थेविरुद्ध विद्रोही संस्कृतिक चळवळीत काम करत आहेत. क्रांतिबा फुले सांस्कृतिक मंच स्थापन करण्यात पुढाकार घेऊन मुंबईमध्ये जातीव्यवस्था विरोधी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम डॉ भारत पाटणकर यांनी संघटित केले होते. मुंबईत कामगार चळवळीत सक्रिय असताना सडक नाटक चळवळीत सुद्धा डॉ पाटणकर हे अग्रभागी राहिले आहेत.
त्याचबरोबर प्राच्यविद्यापंडित कॉ शरद पाटील यांच्या पुढाकाराने उभ्या राहिलेल्या दलित आदिवासी ग्रामीण साहित्य सभेच्या स्थापनेत सुद्धा डॉ भारत पाटणकर यांचा महत्त्वाचा पुढाकार व सहभाग राहिला आहे. या चळवळीच्या वतीने अनेक दलित ,आदिवासी , ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे विसावे शतक सरत असताना महाराष्ट्रात उभे राहिलेले विद्रोही नावाचे वादळ जन्माला घालण्यास इतर अनेकांच्या बरोबर डॉ भारत पाटणकर यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. मुंबईच्या धारावी मध्ये झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या स्थापनेतही त्यांनी तितक्याच समर्थपणे भाग घेतला आहे. आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका ठरवण्यात , तिला तात्विक पाया आणि नवी सांस्कृतिक ओळख देण्यास डॉ. भारत पाटणकर यांचे वैचारिक योगदान महत्त्वाचे राहिले आहे.
डॉक्टर पाटणकर यांना घरातूनच क्रांतीचा वसा व वारसा मिळालेला आहे . क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर आणि क्रांतिवीर बाबूजी पाटणकर या सातारच्या प्रति सरकारमधील सक्रिय असलेल्या दांपत्याचा हा एकुलता एक मुलगा. शिक्षण घेत असताना डॉ भारत पाटणकर हे श्रमिकांच्या चळवळीत ओढले गेले. मागोवा या क्रांतिकारक गटात ते सक्रिय झाले. डॉक्टरकीची पदवी असली तरी पूर्ण वेळ कार्यकर्ता होण्याचा निर्धार केल्याने पुढे आयुष्यात हा प्रतिष्ठा आणि पैसा देणारा व्यवसाय त्यांनी केला नाही . सांगली जिल्ह्यातील मुक्ती संघर्ष चळवळीच्या माध्यमातून दुष्काळ निर्मूलनाची चळवळ जनपर्याय मांडून त्यांच्या प्रस्थापनेसाठी लढे संघटित करण्याची रीत महाराष्ट्रात प्रथमच सुरू करण्यात एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील तेरा दुष्काळी तालुक्यात पाणी संघर्ष चळवळ उभी केली. त्याचबरोबर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा त्यांनी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद तसेच श्रमिक मुक्ती दल यांच्या माध्यमातून काम केले आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व जमिनीला पाणी द्यावयाचे प्रश्न मार्गी लावले. ६ डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली आणि हिंदू मुस्लिम असे एकमेकांविरुद्ध तणावाचे वातावरण तयार झाले. त्यावेळी या विरोधात स्पष्ट भूमिका घेऊन जातीयवादी धर्मांध शक्तींचा रिमोट करण्यासाठी कष्टकरी जनतेला रस्त्यावर उतरून बिमोड दिन साजरा करण्यात डॉ. भारत पाटणकर यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला. पुण्यात गुजरात मधील 2002 सालच्या नरसंहारच्या विरोधात छ. शिवाजी ,फुले , शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गुजरात होऊ देणार नाही अशी भूमिका घेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने पुण्यामध्ये महात्मा फुले वाड्यासमोर एल्गार मोर्चा संघटित केला गेला होता. व धर्मांधता विरोधी परिषद आयोजित करण्यात आली. मुस्लिमांचे जमिनीवरचे प्रश्न मांडणाऱ्या हिंदी है हम हिंदोस्ता हमारा या चळवळीचा जन्म झाला. बडवे आणि उत्पाद यांच्यापासून मुक्ती बरोबरच विठ्ठलाच्या पूजेत चातुर्ण्याची उतरण मांडणाऱ्या पुरुषसूक्ताने होणारी विठ्ठलाची पूजा बंद , यासाठी भूमिका घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले. जाती व्यवस्थेचा अंत केल्याशिवाय भारतात समग्र क्रांती होणार नाही अशी यांची स्पष्ट भूमिका आहे . ती पाटणकर यांनी जाती व्यवस्थेचा अंत या पुस्तकातून ठोसपणे मांडली आहे. केवळ भूमिका मांडून न थांबता त्या दिशेने पावले उचलण्यासाठी सत्यशोधक शेतकरी श्रमिक संघटना आणि श्रमिक मुक्ती दल यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय अंताच्या परिषदा संघटित केल्या. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ स्थापन करण्यातही त्यांचा पुढाकार महत्त्वाचा राहिला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातून पुजारी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारला घेण्याच्या संदर्भात जे आंदोलन झाले. त्यातही डॉ. भारत पाटणकर यांचा गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन सुरू करण्यात महत्त्वाचा वाटा होता. अंबाबाईच्या समग्र मुक्तीची लढाई अजून सुरूच आहे.तसेच सेझ विरोधी लढा त्यांनी अलिबाग परिसरात दिला. डॉ. भारत पाटणकर यांच्या या चळवळीमध्ये आणि संघर्षात त्यांच्या पत्नी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक , समाजशास्त्रज्ञ स्मृतीशेष डॉ गेल ऑम्व्हेट उर्फ शलाका पाटणकर यांचीही भक्कम साथ त्यांना आजवर लाभली होती,अलीकडेच त्यांचे निधन .
 ते कवीही आहेत.कविता झेपावणाऱ्या पंखाची ( कविता संग्रह) , इत्यादी 24 मराठी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून त्यांनी आपले प्रबंध सादर केले आहेत. त्यांना बाबुराव बागुल गौरव पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अरुण लिमये स्मृती युवा पुरस्कार , सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आदी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे पर्यायी सांस्कृतिक क्षेत्रात एक भूमिका घेऊन काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्याचा तसेच चळवळीचा झाला आहे,असे पुणे येथे होणाऱ्या १४ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीला वाटते. अध्यक्षपदावरून ते कोणती भूमिका मांडतात याकडे राज्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे, असे निवेदन संयोजन समितीचे निमंत्रक साथी नितीन पवार , आयु. मानव कांबळे , कॉ लता भिसे , कॉम्रेड मेधा थत्ते, तमन्ना इनामदार , कॉ धनाजी गुरव, कॉ जालिंदर घिगे, प्रा. दळवी, ऍड.मोहन वाडेकर, शितल साठे, ॲड.अविनाश सूर्यवंशी कावळगावकर यांनी केले आहे.‌
www.massmaharashtra.com 

 

 

ताज्या बातम्या