शेती- मातीत राबणाऱ्यांची व्यथा : आम्हाला सौजन्याचा शाप !!

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]                                                                                                                                                                  कवी व्यंकट आनेराये यांचा कविता संग्रह “आम्हाला सौजन्याचा शाप” माझ्या हाती आला तेव्हा मला मनापासून आनंद झाला. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून या माणसाने जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. एवढेच नव्हे तर जवळपास साठ ते सत्तर वेळा वक्तृत्व स्पर्धेत आपल्या शाळेला पहिले बक्षीस मिळवून दिले. त्यांची विषयानुरूप संहिता लिहायची कला अतुलनीय आहे. त्यांनी काव्यात मांडलेला विषय परीक्षकांच्या मनावर राज करायचा म्हणून तर शाळा बदलल्या, स्पर्धेचे विषय बदलले, परीक्षक बदलले,परंतु व्यंकट आनेराये यांच्या शाळेचा पहिला नंबर कधीच बदलला नाही. अशा गुणी लेखकाचा कवितासंग्रह प्रकाशित व्हावा असे मला मनोमन वाटत होते. कवितासंग्रहाच्या पहिल्याच कवितेत अतिवृष्टीने शेती उध्वस्त झालेल्या उदास हतबल झालेल्या बळीराजाला धीर देताना कवी लिहितात.

      जाउ नको बळी, जग जरा धीरानं !                  जरी आली सुनामी, दाबत रहा उरानं !! 

      रात्रंदिवस शेती-मातीत काबाड कष्ट करणारे माय -बाप हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. अस्मानी- सुलतानी संकटांमुळे शेतकरी हवालदिल झालाय.हा कवितासंग्रहाचा गाभा आहे. कवी व्यंकट आनेराये यांच्या “बेभान पाऊस”या कवितेत कवी सहजच लिहून जातात.
 पिढ्यानपिढ्या पासून नित्य असेच शेतं वाहून जातात !         कष्टकरी बापाचे मनसुबे असेच उरात राहून जातात ।            बाप सोडत नाही आशा जरी मान टाकली घाटानं !           कोण देत असेल एवढं बळ पुन्हा उभा राहतो नेटानं !
    कधी कोरडा दुष्काळ ,कधी अतिवृष्टी पावसामुळे बळीराजा हैरान आहे. त्याला टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी राज सत्तेपुढे पदर पसरावा लागतो.हे दुःख व्यंकट आनेराये यांनी कवितेतून मांडले आहे. कवी व्यंकट आनेराये यांचे ” तरच मंगल” ही कविता अंतर्मुख करणारी आहे. ते लिहितात.
              रोषणाईने साजरी दिवाळी आनंदात !                             गळ्यात गळे घालून गाणे गात !                                मात्र आई-वडील वृद्धाश्रमात, उपाशीच !!
आम्ही आज श्रावण बाळाच्या देशात आई वडिलांची सेवा करण्यास असमर्थ झालो.आजच्या आधुनिक युगात मित्रांची, आप्त स्वकीयांची, रंगत-संगत मनाला भावते, परंतु घरात आई-वडील नकोशी झालेत.ही खंत कवीच्या मनाला वाटते, कवी मुक्तछंद कविता सहज लिहिताना “पुनर्वसन” सारख्या कवितेतून आजच्या बेरोजगार तरुणांची व्यथा आपल्या कवितेतून मांडतात.
   लोकशाहीच्या सोहळ्यात उत्साहाने नाचणारी तरुण.पंधरा-वीस गुंठा जमिनीचे ठिगळ कसणारे डिग्रीचे तुकडे घेऊन दारोदार फिरणारे वैफल्यग्रस्त कसे पोट भरतील? 
 कवीला अपेक्षा आहे की, तरुणाईला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करता येईल का? असा प्रश्न कवीच्या मनाला भेडसावतो. कवी आपल्या कविता संग्रहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालतात. स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक आहे. एका जीवाला मुलगी म्हणून तो जन्म घेण्यापूर्वी संपवण्याच्या विकृत मनोवृत्ती मानवजातीला अशोभनीय आहे. म्हणून कवी व्यंकट आनेराये यांची “पुलकीत कर जीवन माझे” ही कविता मुलीच्या जगण्याचा हक्क मागते. कन्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे असं कवीला वाटते. आणि कवी पुढे लिहितात.   

अगं आई….                                          मुलगा म्हटलं की फुलाप्रमाणे जपतेस,              अन् मुलगी म्हटलं की पोटातच कापतेस !

       अशा कितीतरी गंभीर विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. कवी व्यंकट आनेराये यांचा “आम्हाला सौजन्याचा शाप” हा कवितासंग्रह आज दिनांक २८ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होत आहे.कवी विरभद्र मिरेवाड यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे.या काव्य संग्रहची पाठराखण साहित्यिक देविदास फुलारी यांनी केली आहे.इसाप प्रकाशनाची खूप चांगली बांधणी आणि मांडणी त्यामुळे हा कवितासंग्रह वाचनिय झाला आहे. त्यांच्या प्रकाशनाला भावी त्यांच्या हातून असेच उत्तमोत्तम अनेक कवितासंग्रह प्रकाशित होत राहावो अशी सदिच्छा व त्यांच्या काव्य प्रकाशन सोहळ्याला हार्दिक शुभेच्छा !

[ “आम्हाला सौजन्याचा शाप (काव्यसंग्रह) ]

व्यंकट आनेराये, इसाप प्रकाशन, नांदेड ( पृष्ठ:96 मुल्य:160 )
परिचयाक – प्रा.मारोती खनपटे / कृष्णकुंज, नायगाव. मो. ७५८८१५०८३१
www.massmaharashtra.com

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या