समकालीन कवितेची सम्यक चिकित्सा – कविता सौंदर्य शोध आणि समीक्षा !

सुप्रसिद्ध ललित लेखक, मुक्त पत्रकार आणि समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार लिखित ‘कविता: सौंदर्य शोध आणि समीक्षा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत अहमदपूर येथे संपन्न होत असून, त्यानिमित्त सदरील ग्रंथाची ओळख करून देणारा डॉ.मारोती कसाब यांचा लेख आमच्या खास वाचकांसाठी देत आहोत. – संपादक
[ विशेष प्रतिनिधि / रियाज पठान ]
कविता हा इतर सर्व साहित्य प्रकारांपेक्षा मोठ्या प्रमाणात लिहिला जाणारा लोकप्रिय साहित्यप्रकार होय. बहुतेक सर्वच साहित्यिकांची सुरुवात ही कविता लेखनापासून होते. सुरुवातीला कविता लिहून मग कथा, कादंबरी, नाटक, वैचारिक साहित्य आणि समीक्षा लेखनाकडे वळलेली भरपूर लेखक मंडळी दिसून येतात. मराठी साहित्याची तेजस्वी सुरुवातच मुळी कवितेपासून झाली असे म्हणता येते. महानुभावांनी आणि वारकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात काव्य रचना करून मराठी साहित्याची पायाभरणी केली आहे. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जाते, वाचली जाते; मात्र कवितेची समीक्षा म्हणावी तशी होत नाही. अशा प्रकारची समीक्षा करण्यासाठी समीक्षकाजवळ काही गुण असावे लागतात. ‘एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराला समजू शकतो’. या अर्थाने कविता समजून घेण्यासाठी समीक्षक हा स्वतः कवी असावा लागतो. आपल्याकडे कवी आहेत; मात्र समीक्षकांची कमतरता आहे. वास्तविक पाहता कवितेची समीक्षा मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज असते. कारण प्रत्येक कविता सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी अपेक्षा करता येत नाही.
कवितांचे रसग्रहण करण्यासाठी समीक्षकच असावा लागतो.
जागतिकीकरणानंतरच्या काळात मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली जात आहे. वास्तविक पाहता कविता हा समूहाला आवाहन करणारा साहित्यप्रकार असतो. लोकमत घडविण्यामध्ये आणि समकालीन सामाजिक प्रश्नांना उजागर करण्यामध्ये कवितेचा मोठा सहभाग असतो. कविता ही क्रांतीला जन्म देत असते. मात्र ती तिच्या अर्थांसह लोकांपर्यंत पोचली तरच. आणि अशाप्रकारे कविता समजावून सांगून सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम समीक्षक करीत असतो. म्हणून कवी इतकाच समीक्षकही महत्त्वाचा आहे. समकालीन कविता तिच्या अर्थवत्तेसह लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम निर्भीड पत्रकार आणि ललित लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार हे सातत्याने करीत असून, ‘ कवितेच्या गाभाऱ्यात’ नंतर ‘ कविता: सौंदर्य शोध आणि समीक्षा ‘ हा त्यांचा काव्य समीक्षेचा सलग दुसरा ग्रंथ देगलूरच्या गणगोत प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे.
१६० पानांच्या या देखण्या ग्रंथात लेखक डॉ. वसंत बिरादार यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निवडक बारा कवींच्या काव्यसंग्रहांवर अत्यंत विस्ताराने भाष्य केले आहे. कवितेबद्दलच्या आपुलकीतून हे लिखाण झालेले असले तरी समीक्षकाला आवश्यक असणारी तटस्थता ही या ग्रंथामध्ये लेखकाने सांभाळली आहे, हे विशेष होय. जुन्या पिढीतील अनवट प्रतिभेचे कवी प्राचार्य कृष्णचंद्र ज्ञाते वगळता इतर सर्व कवी हे नव्या पिढीचे विद्रोही कवी आहेत, हा ही या ग्रंथाचा मला महत्त्वाचा विशेष वाटतो.
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार हे कविसंमेलनांतून मिरवणारे कवी नसून, उत्स्फूर्तपणे काव्य निर्माण करणारे, लोकभाषा आणि प्रमाण भाषेची सम साधून शब्दलालित्याचा उत्तम आविष्कार करणारे शब्द सृष्टीचे खरे कवी आहेत. कवितेचे अभ्यासक, संकलक आणि संशोधक असण्याबरोबरच ते चोखंदळ रसिक आहेत. प्रस्तुत ग्रंथात आस्वादासाठी त्यांनी जी १२ पुस्तके निवडली; त्यांची शीर्षके पाहीली तरी त्यांच्या काव्य रसिकतेची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ‘ तू, मी आणि कविता’ (कृष्णचंद्र ज्ञाते), ‘धपाटे’ ( वि.सो. वराट) , ‘ खोल डोहातल्या सावल्या’ ( नागनाथ पाटील), ‘ चुंबळ तरी घेऊ दे ! ‘ ( प्रा. आनंद कदम ), ‘चल भटकू विस्कटू धावू ‘ ( प्रिया जामकर ), ‘रातंदिन असे’ (मारोती कसाब ), ‘दीपज्योती’ ( प्रा. देवबा शिवाजी पाटील), ‘भूक’ ( बाबा जाधव), ‘माती शाबूत राहावी म्हणून’ ( वीरभद्र मिरेवाड), ‘कैवार’ (शिवाजी नारायणराव शिंदे) , ‘कोल्हेवाडीचा बाजार’ (शंकर बोइनवाड), आणि ‘मी उजेडाच्या दिशेने निघालो’ ( अरुण हरिभाऊ विघ्ने ) ही काव्यसंग्रहाची शीर्षके आणि कवींची नावे वाचली तरी वाचकांना या ग्रंथाचे वेगळेपण लक्षात यावे.
प्राचार्य कृष्णचंद्र ज्ञाते वगळता इतर सर्व कवी हे समकालीन आहेत आणि मुख्य म्हणजे व्यवस्थेच्या लाभापासून हजारो मैल दूर आहेत.वंचित आहेत. या सर्व कवींनी आपल्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीतून प्रत्यक्ष जीवन व्यवहारातील त्यांना जाणवलेले सत्य मांडले आहे. हे कवी निर्भीडपणे व्यवस्थेशी दोन हात करताना, भिडताना दिसतात. अंबाजोगाई येथील विश्वंभर वराट हे ज्येष्ठ कवी मुजोर विषमतावादी, भांडवली व्यवस्थेच्या ‘पाठाडात’ जोरदार ‘धपाटे’ घालतात. त्यांची पाठराखण करताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी त्यांना ‘संत तुकारामांचे खरे वैचारिक वारसदार ‘ अशी दिलेली पदवी सार्थ वाटते. कवीने सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, विषमतावादी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारले पाहिजे, हेच येथे लेखकाने सूचित केले आहे. विश्वंभर वराट यांच्या कवितेला असलेल्या लोक लयीची आणि लोक विकासाची ओढ समीक्षक डॉ. वसंत बिरादार यांनी सुंदर शब्दांत गौरविली आहे.
ग्रामीण कथा-कादंबरीकार प्राचार्य डॉ.नागनाथ पाटील यांच्या ‘खोल डोहातल्या सावल्या’ या काव्यसंग्रहाची दर्दभरी दास्तान प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी अंतःकरणाच्या ओलाव्याने उलगडून दाखविली आहे. हाताशी आलेल्या ऐन तारुण्यातील मुलाचे निधन ही अंत:करण हेलावून सोडणारी घटना कवीच्या हृदयात घर करून बसली. या दुःखातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग तो म्हणजे कविता. कवीने कवितेतून आपली दर्दभरी कहाणी वाचकांना सांगितली आहे. माणसाला आपलं मन मोकळं करण्याचा यापेक्षा प्रशस्त मार्ग दुसरा कोणताही असू शकत नाही हेच या काव्यसंग्रहावर केलेल्या भाष्यातून लेखकाने दाखवून दिले आहे.
वि. सो. वराट , आनंद कदम, मारोती कसाब, बाबा जाधव, अरुण विघ्ने या कवींनी प्रत्यक्ष जीवन जगत असताना आलेल्या अनुभूतींनाच शब्दरूप दिले आहे. त्यांच्या कवितेतून सामान्य माणसाबद्दलचा कळवळा कसा व्यक्त झाला आहे, सामाजिक प्रश्नांचा जागर या कवींनी कसा घातला आहे, त्याचबरोबर या कविता क्रांतीला कशा बळ देणाऱ्या ठरतात हेही साधारपणे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी मांडले आहे. कवी हा केवळ मिरवणारा ‘कवडा ‘ नसावा; तर तो लोकांसाठी, लोकांबरोबर, किंबहुना लोकांच्या संघर्षात सर्वांत पुढे राहून रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता, ध्येयवेडा असावा.
हेच या विवेचनातून लेखकाने सूचविले आहे. प्राध्यापक असलेल्या प्रिया जामकर यांची कविता भारतीय स्त्रीवादाचे उदात्तीकरण कशी करते आणि स्त्रियांची दुःखं कशी उजागर करते, स्त्री-पुरुष समानतेची कशी मागणी करते याचेही अत्यंत मनोज्ञ चित्रण डॉ. वसंत बिरादार यांनी तन्मयतेने केले आहे. वीरभद्र मिरेवाड, शिवाजी नारायणराव शिंदे यांच्या कवितेतील ग्राम जाणीवा, शेतकरी आणि निसर्ग यांचे नाते, बदलते ग्रामजीवन, नातेसंबंध आणि त्यातील ताण तणाव यासह एकूणच कवितेतून प्रकट झालेली गावकळा डॉ. वसंत बिरादार यांनी लिलया उलगडून दाखविली आहे. शंकर बोइनवाड यांच्या ‘कोल्हेवाडीचा बाजार’ या काव्यसंग्रहातून व्यक्त झालेल्या निरागस बालमनाचा सहज सुंदर धांडोळाही त्यांनी घेतला आहे.
एकंदरीत जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरील निवडक ‘बारा काव्यसंग्रहांचा आस्वादक समीक्षेच्या अंगाने परिचय’ असे जरी या ग्रंथाचे स्वरूप असले तरी, मराठी काव्य समीक्षेच्या प्रांतामध्ये प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी केलेला हा प्रयोग म्हणजे एकूणच मराठी साहित्य समीक्षेला नवी दिशा देणारा ठरेल यात शंका नाही. प्रस्तुत समीक्षेच्या अनुषंगाने लिहीत असताना डॉ. वसंत बिरादार यांनी नेहमीप्रमाणेच ‘ लोलकरंग ‘ , ‘शब्दांचे पद्मबंध ‘ , ‘ कोरीव नाव’ , ‘ अनवट वळण’ , ‘ दुर्बोध तेची मिठी ‘ , ‘ कवितेचे बुद्धिनिष्ठ आकलन’ , ‘ कवितेचे थर्मामीटर’ ‘तर्कातीत अनुभव’ , ‘कवितेची काठिण्यपातळी’ , ‘ शब्दांचे अंतः संगीत ‘ , नादानुवर्ती लय , ‘ कबुली जवाब -कन्फेशन ‘ तसेच या गूढतेमुळे वाचक बिथरतो, भांबावतो, बावचाळतो, आणि चिडतो ही ‘ अशी नवनवीन शब्द कळा वापरली आहे. असे शब्द आणि शब्द समूह वाचनाची गोडी वाढवतात. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून लेखकाने माय मराठीत अनेक नवीन शब्दांची भर टाकली आहे, ती फार महत्त्वाचे आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. ‘ कविता: सौंदर्य शोध आणि समीक्षा’ या ग्रंथाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील लेखनासाठी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना खूप खूप शुभेच्छा देतो.
डॉ. मारोती कसाब
महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि. लातूर
भ्रमणध्वनी – ९८२२६१६८५३
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या