साहित्य हे समाज प्रबोधनाचे मोठे साधन– शिवा कांबळे यांचे प्रतिपादन

( विशेष प्रतिनिधी / रियाज पठान )

नांदेड:दिनांक- 23/9/2020
चांगले साहित्य समाजाला प्रेरणा देते. अशा चांगल्या साहित्यातून समाजिक मूल्य जपण्यासाठी मदत होते. साहित्य हे समाजप्रबोधनाचे मोठे साधन असून असे चांगले साहित्य समाजात येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे माजी सदस्य आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कारप्राप्त शिक्षक शेषराव पवार लिखित किंमत माणसाची या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच नांदेड येथील सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात शिवा कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी के. पी.सोने हे होते. तर प्रकाशन समारंभाचे उद्घाटन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नीळकंठ चोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे सचिव आणि शिक्षक नेते मधुकर उन्हाळे, संचालक आणि लसाकम चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, प्रकाशक संजय सुरनर, संचालक डी.एम.पांडागळे, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि लसाकम चे मराठवाडा उपाध्यक्ष शिवाजी टोम्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्य हे समाजाची प्रतिकृती असून मानवी जीवन अनुभव शब्दरूपाने साहित्यात अभिव्यक्त होतात. अशा साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन आणि परिवर्तन होत असते. कथा हा साहित्यप्रकार आशय आणि रूपाने कादंबरी पेक्षा लहान असला तरी जीवनातील विशिष्ट अनुभव मर्यादित भाषिक अवकाशामध्ये तीव्रपणे प्रसिद्ध करणारा तो एक साहित्यप्रकार असून हा साहित्यप्रकार अगदी लीलया शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षक वनश्री शेषराव पवार यांनी आपल्या किंमत माणसाची या कथासंग्रहातून मांडला असल्याचे गौरवोद्गार शिवा कांबळे यांनी काढले.
किंमत माणसाची हा कथा संग्रह म्हणजे माणसाच्या जगण्याला बळ देणारा एक कथासंग्रह असून या कथासंग्रहाच्या माध्यमातून सामाजिक मूल्ये जपली जातील असा आशावाद शिक्षक नेते मधुकर उन्हाळे यांनी व्यक्त केले. समाज जाणीवेचा मुर्तीमंत आविष्कार म्हणजे किंमत माणसाची हा कथासंग्रह असून या कथासंग्रहाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम शेषराव पवार यांनी केले असल्याचे मत उद्घाटन प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन निळकंठ चोंडे यांनी व्यक्त केले. कथासंग्रह वरील भाष्य करताना लसाकम चे जिल्हाध्यक्ष आणि पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत मेकाले यांनी किंमत माणसाची या कथासंग्रहातील जीवन जाणिवा आणि सामाजिक मूल्य व कथासंग्रहाचे मोठेपण सांगताना किंमत माणसाची हा कथासंग्रह म्हणजे शेषराव पवार यांच्या वास्तव जीवनानुभूतीचा उत्तम आविष्कार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी के.पी. सोने यांनी शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे काम करणाऱ्या एका लढवय्ये आणि प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रात सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याने लिहिलेली ही एक कर्मकहाणी असल्याचे गौरवोद्गार के.पी.सोने यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लसाकम चे बालाजी गवाले यांनी केले तर आभार प्रदर्शन लसाकम चे कार्यकर्ते बालाजी गुंडले यांनी मानले.
या कार्यक्रमाला आनंद पवार, गंगाधर कावडे, साहेबराव गुंडले, किरण बोईनवाड,शिक्षक नेते एल.बी. चव्हाण, सोनटक्के सर ,शिंदे सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या