लोहा तालुक्यात ढगफुटी, धानोरा,आडगावात पिके वाहून शेतीचे लाखोंचे नुकसान

( विशेष प्रतिनिधी /रियाज पठान )

नांदेड –
लोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अक्षरशः ढगफुटी झाली असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे लोहा तालुक्यातील गांधीनगर तसेच आडगाव येथे अक्षरशः जमीन वाहून गेली. पुराच्या पाण्यात शेतीतील पिके अक्षरशः पाण्याबरोबर वाहून गेली आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने लोहा तालुक्यात दमदार हजेरी लावली. आज सकाळी लोहा तालुक्यातील विविध भागात अक्षरशः ढगफुटी झाली.यंदा प्रारंभीपासून पाऊस कमी अधिक प्रमाणात बरसला होता. आज सकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः ढगफुटी झाली.काढणीला आलेल्या सोयीबिनला या पावसाचा प्रचंड तडाखा बसला.मुसळधार पावसामुळे जमीन अक्षरशः खरडून गेली.परिणामी पुराच्या पाण्यात पिके वाहून जाताना दिसत होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावल्याचे चित्र दिसून आले.सततच्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला , ज्वारीला कोंब फुटले, तर कापूस नासून कोंब फुटले आहेत. वर्षभर राब-राब राबणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने चांगलाच हिसका दिला आहे. पेरणी पासून आजतागायत झालेला खर्च निघणे दुरापास्त झाले आहे. या जास्तीच्या पावसामुळे नुकसान भरून काढणे तर शक्यच नाही परंतु बी-बियाणे, खते ,रोजगार यासाठी झालेली लोकांची घेतलेली उसनवारी व व्याजाची रक्कम भरणे अवघड होऊन बसल्यामुळे पाऊस जोमात तर शेतकरी कोमात म्हणण्याची वेळ आली आहे.शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे जे भरून निघू शकत नाही मात्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून या संकटापासून सावरण्यासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी ऍड. गणेश क्षिरसागर ,सह गांधीनगर येथील शेतकरी सुरेश नागरगोजे,संभाजी नागरगोजे यांनी केली आहे.

आडगाव येथे ढगफुटी
गावाचा संपर्क तुटला
————————————-
आज सकाळी झालेल्या पावसाने आडगाव तालुका लोहा येथे ढगफुटी झाली असल्याचे चित्र दिसून आले. संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले होते. जिल्हा परिषद शाळेत,घरात, दुकानात, गोठ्यात सुद्धा पाणी साचले व गावाला चोहुबाजूने वेढले. क्षणातच पिके ही होत्याचे नव्हते झाली.

ताज्या बातम्या