बहुजन समाजाच्या तोंडाला अर्थसंकल्पाने पाने पुसली आहेत – सुरेश गायकवाड

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)
कोविडच्या पार्श्‍वभूमिवर राज्याच्या महाआघाडी सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्याने बहुजन समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याची टिका प्रजासत्ताक पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
राज्याचे अर्थमंत्री यांनी आगामी वर्षाकरीताचा विधान सभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांची भलावण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या एक वर्षात कोविड या महामारीने थैमान घातले त्यावर उपाय योजना करण्यासाठी भरीव तरतुद केली व राज्यातील जनतेला विश्‍वास दिला. शेतकरी वर्गासाठी कर्ज माफी योजना यापूर्वीच केली आणि आता नव्याने बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रक्कमेची तरतुद केल्या गेली. विजमाफीसह अवर्षण, अतिवृष्टी सारख्या नैसर्गीक आपत्तीत ही मदत केल्या गेली. अवकाळी पाऊस आणि नापीकीची नुकसान भरपाई दिल्या गेली. सरकाने कोविड वरील उपाय योजना आणि शेतकरी बांधवासाठी आपल्या तिजोरीचा वापर केला त्या बद्दल आम्हास समाधान आहे.
राज्यातील बहुजन समाज नाही रे वर्गातील आहे. तो शेत मजूरी, सरकारी कजूरी अंग मेहनतीवरच अवलंबून आहे. या नाही रे वर्गास दिलासा देण्यासाठी गेल्या एक वर्षात सरकारने कोणताही कृती कार्यक्रम हाती घेतला नाही. आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पातही या वर्गासाठी नव्याने कोणतीही विकास विषयक योजना प्रस्तावित केली नाही त्याबद्दल आम्हास सरकारच्या हेतूबद्दल संशय येतो आहे. हे सरकार जाणीवपूर्वक बहुजन समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे. ऊठसुठ कार्यक्रमात शाहु,फुले, आंबेडकर यांचा गौरव करायचा आणि त्यांच्या जनतेसाठी मात्र ठोस किंवा भक्कम विकास साधण्यासाठी कोणतीही योजना घोषीत करायची नाही ही सरकारची जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे.
बहुजन समाजाच्या सुशिक्षीतांना शासकीय नोकरी, बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक पॅकेज, बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या कल्याण विषयक, शेतमजूरांच्या सबलीकरणासाठी ठोस कृती कार्यक्रम व त्यांच्यासाठी भविष्य ठेवीची घोषणा या सरकारकडून अपेक्षीत आहे. परंतु अशी कुठलीच घोषणा न करता सरकार बहुजन समाजाला राज्याच्या विकास प्रक्रियेतून हद्दपार केले आहे. राज्यातील लोकजिवनातील त्यांचे अस्तीत्व नाकारले आहे. या सरकारला सेक्युलर का म्हणावे हाच खरा प्रश्‍न आमच्या समोर ऊभा टाकला आहे. शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी माणूस रिकाम्या पोटाने व अनवानी पायाने प्रस्तावित केल्या गेलेल्या सडकावरुन चालणार आहे काय? असा जाहीर सवाल या सरकारला आम्ही विचारत आहोत. एकंदरीत या अर्थसंकल्पाने बहुजन समाजाची साफ निराशा केली असून तोंडाला पाने पुसल्याने या अर्थसंकल्पाबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे. सरकारने ताबडतोब लक्ष द्यावे असे आवाहन प्रजासत्ताक पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी केले आहे.

ताज्या बातम्या