महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर !
( ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते )
इतिहास कालीन गडकिल्यांच्या स्वच्छता,वृक्षारोपण आणि गोर गरीब नागरिकांना वेळीच मदती करिता धावून जाणाऱ्या महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठान (ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान संलग्न) या संस्थेच्या वतीने नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती तसेच हळदी- कुंकू समारंभ कार्यक्रम भिवंडी येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी घेण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्रदेश वैदयकीय सल्लागार डॉ. तृप्ती वाघ यांनी प्रतिष्ठानचे कार्य कसे चालते, त्यांना संस्थेत काम करताना आलेला अनुभव सविस्तर रित्या सांगितले.
संस्थे मार्फत आतापर्यंत कोणकोणते उपक्रम घेतले जातात याची ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष प्रज्ञा जाधव यांनी माहिती दिली. तर ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नम्रता पाटील यांनी प्रतिष्ठान कशाप्रकारे मदत करते आणि पुढे संस्थेचा विस्तार कसा करायचा याविषयी माहिती दिली. तसेच संस्थेचे अध्यक्ष अमोल कदम यांनी संस्था कोण- कोणत्या स्वरूपात कार्य करते कश्या पध्दतीने करते, पदाधिकारी यांनी कश्या पद्धतीने समाजामध्ये कार्य करायला हवे या विषयी महिलांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय सल्लागार पदी डॉ. तृप्ती वाघ, ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रज्ञा जाधव, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी नम्रता जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी अश्विनी कुंभार,भिवंडी शहर अध्यक्ष सुनिता मामीडाल, भिवंडी शहर उपाध्यक्ष युगंधरा गलैंया,भिवंडी शहर कार्याध्यक्ष पदी सुवर्णा भोईर,बदलापूर अध्यक्ष पदी सुजाता पवार यांची निवड करण्यात आली.
हळदी – कुंकू समारंभ कार्यक्रम प्रसंगी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी कुंभार यांनी केले.