शनिवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी हॉटेल सिरोया पॅलेस, श्रीवधनच्या दिमाखदार हॉलमधे श्री राजेंद्र हिरालाल धारिया यांचा दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं शाखा पेण येथून निवृत्ती व मित्र परिवाराचा स्नेहमेळावा असा दुग्द्धशर्करा योग जुळून आला होता. श्री राजेंद्रभाई डिव्ही. ऑफिसर म्हणुन ३४ वर्षे इतकी अविरत सेवा करून निवृत्त झाले, त्यांचे वरिष्ठ अधिकार्यांसोबत तसेच कनिष्ठ सेवा वर्गासोबत अगदी समन्वयाचे नाते होते.
अत्यंत प्रेमळ, मनमिळावु, माणुसप्रेमी अशी त्यांची ख्याती आहे. गोड हवंहवंसं नातं जपणं हा त्यांचा मूळ स्वभावधर्मच ! महाड अर्बन बँकेतली नोकरी सोडून ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी जॉइन केली अन ते तिथेच सुखनैव स्थिरावले. निवृत्त झाल्यावर एक आनंद सोहळा म्हणुन मित्र, परिवार यांचेसाठी त्यांची पत्नि सौ रूपा धारिया यांनी स्नेहमेळावाचे आयोजन केले. समाजातील सर्व घटकातून श्रीवर्धन तसेच खेड, पोलादपुर, महाड, लोणावळा येथून त्यांचे अनेक आप्त, मित्र, सगे सोयरे या स्नेह मेळाव्याला आवर्जुन उपस्थित होते.या सुंदर कार्यक्रमाच्या नियोजनाची बहुतांश जबाबदारी त्यांच्या पत्नी रूपाताई धारिया यांनी समर्थपणे यशस्वी पार पाडली.
सिरोया पॅलेसच्या हॉलमधील सजावट देखणी दिलखेचक होती. उपस्थितांचे स्वागत चहा, कॉफीने होत होते. या कार्यक्रमाची सुरवात श्री सुधोरभाई शेठ, महाड यांनी त्यांचे भावपूर्ण प्रास्ताविक सादर करून केली, राजेंद्रभाईच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. त्यानंतर राजेंद्रभाई या उत्सवमुर्तीवर गौरवपर प्रेमाचे चार शब्द श्री सुनील शरद चिटणीस, श्री अविनाश गांधी, सौ वर्षा तलाठी, सौ सुगंधा गांधी, सौ सीमा रिसबूड, सौ अनिता कांबळे इत्यादिंनी व्यक्त केले.
सौ रुपा धारिया यांनी, माझ्या आयुष्यात मला माझ्या पतीची व कुटुंबाची उत्तम साथ लाभली, त्यांच्या सोबतचे सहजीवन हे आनंदमयच आहे अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे उत्सवमुर्ती श्री राजेंद्रभाई यांनी त्यांच्या मनोगतात, माझ्या आयुष्याची सुरवात अगदी गरीब परिस्थितीतून झाली, माझ्या खडतर जीवनात अनेक अडथळ्यांची शर्यत पार करतच आज यशस्वी जीवनाच्या उंबरठ्यावर मी उभा आहे अन मला माझ्या पत्निची, माझा मुलगा ओम यांची अनमोल साथ लाभली आहे. माझ्या प्रेमळ सहकार्यांची, आप्त, नातेवाईक मित्रमंडळी साथ लाभली म्हणूनच मला या यशापर्यंत मजल गाठता आली त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे अशा प्रेमाच्या सौदार्यपूर्ण भावना डोळ्यांच्या कडा ओलावत त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला उपस्थित अरुणाऱ्या सर्वांनीच राजेंद्रभाईंना दिर्घायुष्य लाभो, भावी आयुष्याची कमान अशीच यशोमान राहो अशा भरभरून शुभेच्छा दिल्या. या आनंद सोहळ्याला माऊथ ऑर्गनिस्ट श्री उदय चव्हाण व गायक श्री प्रदीप शिंदे यांच्या कोरावके ऑर्केस्ट्राचे नियोजन केले होते, ही संगीतमय संध्याकाळ मऊ मुलायम बरसणाऱ्या श्रावणातल्या रेशिमधारा झरत असताना उत्तम भोजनाच्या साथीने अधिकच बहारदार, रंगतदार झाली.
या सुंदर सोहळ्याचे सुत्रसंचालन श्री सुधीरभाई शेठ, श्री सुनील चिटणीस व सौ रूपाताई धारिया यांनी केले, कार्यक्रम अत्यंत आनंदोत्सवात साजरा झाला.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy