माणगाव परिषद आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर !

कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेस इंन अशा जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांमधून एम ए पीएचडी अशा उच्च पदव्या प्राप्त करून डॉक्टर आंबेडकर मायदेशी परतले तोपर्यंत ज्ञान देण्याघेण्याचा शिकण्या- शिकविण्याचा मक्ता फक्त ब्राह्मणांनीच बळकावलेला होता.

अशा कर्मठ पार्श्वभूमीवर अस्पृश्य अशा महार जातीतील एका तरुणाने प्रकांड पांडित्य प्राप्त केले याचा सुधारणावादी शाहू महाराजांना अत्यंत अभिमान वाटणे सहाजिकच होते.

तत्कालीन कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांताच्या गव्हर्नरच्या अंमलाखाली होते सरकारी कामानिमित्त मुंबईला नेहमी यावे लागत असल्याने शाहू महाराजांनी वास्तव्यासाठी एक इमारतच मुंबईत विकत घेतली होती.

अशा कामानिमित्त बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड येत असत. तेव्हा या दोन्ही महाराजांच्या भेटीगाठी होत.

बडोदा महाराजांनीच शिष्यवृत्ती देऊन डॉक्टर आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी पाठवले होते. पीएचडी पर्यत शिकून सिडनहॅम कॉलेजात डॉक्टर आंबेडकर प्रोफेसर आहेत, ही हकिकत शाहू महाराजांना सयाजीराव कडून भेटीगाठी कळली होती. तसेच कोल्हापुरातील आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पवार यांच्यामार्फत ही शाहू महाराजांना डॉक्टर आंबेडकरांबद्दल माहिती कळालेली होती.

अस्पृश्य समाजातील या उच्च विभुषीत विद्वानांस कोल्हापूर संस्थानात बोलावून संस्थानातील मागासलेल्या रयतेचा उद्धार करण्यास पुढाकार देण्याची तसेच या विद्वानास भेटण्याची अनिवार इच्छा महाराजांना झाली.

तेव्हा कोल्हापुरातील अस्पृश्य समाजातील एक कार्यकर्ते व स्नेही दत्तोबा संतराम पवार व दळवी यांना, प्राध्यापक आंबेडकरांना निमंत्रण देण्यासाठी त्यांनी मुंबईला रवाना केले.

शाहू महाराजांचा प्रामाणिक उद्देश या बद्दलच्या प्रामाणिक तळमळी बद्दल खात्री पटताच आंबेडकरांनी कोल्हापुरात येण्याचे मान्य केले. ही घटना 1919 सालातील आहे.

ठरल्याप्रमाणे डॉक्टर आंबेडकर सकाळच्या रेल्वेने आले रेल्वे स्टेशनवर महाराजांचे खाजगी कारभारी कुंभोजकर यांनी तसेच दत्तोबा पवार त्यांचे स्नेही गंगाधर यशवंत पोळ यांनी हारतुरे घालून डॉक्टर आंबेडकर यांचे स्वागत केले. स्टेशन वर चहापान झाले नंतर स्टेशन समोरील महाराजांच्या गेस्टहाऊसवर येथे डॉक्टर आंबेडकरांची राहण्याची सोय केली होती.ते डॉक्टर आंबेडकर यांना देण्यात आले.

थोड्यावेळाने गेस्टहाऊसवर चहापान होऊन कुंभोजकर यांनी आणलेल्या दोन घोड्यांच्या खास रथातून दत्तोबा पवार, गंगाधर पोळ यांच्यासह डॉक्टर आंबेडकर राजवाड्याकडे रवाना झाले.

त्यांचे हार्दिक स्वागत खुद्द शाहू महाराजांनी केले. ओळख-पाळख झाली अस्पृश्यांच्या उद्धारासंबंधी चर्चा झाली व कोल्हापूर संस्थानात लोकजागृतीसाठी एक परिषद घेण्याचे निश्चित करण्यात आले.

महाराजांनी डॉक्टर आंबेडकर यांना दोन दिवस अगत्याचे ठेवून घेतले नंतर डॉक्टर आंबेडकर मुंबईला परत गेले. परिषद बनविण्याच्या दृष्टीने दत्तोबा पवार यांनी पुढाकार घेऊन कोल्हापुरातील रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे, तुकाराम आप्पाजी, गणेश आचार्य, शिवराम धर्माजी कांबळे, रामचंद्र कांबळे आधी कार्यकर्त्यांशी चर्चा सल्लामसलत केली.

डॉक्टर आंबेडकरांशी पत्रव्यवहार करून सल्ला व संमती मिळवली व अस्पृश्यां  विषयी आस्था असलेल्या जैन समाजातील सुधारणावादी आप्पासाहेब पाटील गाव प्रमुख असलेल्या कागल जहागिरीतील माणगाव मुक्कामी 21 22 मार्च 1920 रोजी परिषद घेण्याचे निश्चित केले.

परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकर यांना निमंत्रित करण्याचा पवारांचा प्रस्ताव शाहू महाराजांनी मान्य तर केलाच पण परिषदेला स्वतः उपस्थित राहून सर्वतोपरी सहाय्य करण्याचे मान्य केले.

त्याप्रमाणे पत्रके छापून गावोगावी वाटण्यात आली परिषद यशस्वी करण्यासाठी कामाचा विभागणीनुसार गल्ली वार प्रतिनिधित्व असलेल्या कार्यकर्त्यांच्या काही समित्या सर्वानुमते स्थापन केल्या !

क्रमशः……….

(  संकलन- अरूणकुमार सुर्यवंशी  )

ताज्या बातम्या