पुनर्वसनाच्या चाळीस वर्षानंतरही मनुर मुलभुत सुविधा पासून वंचीत !

(धर्माबाद – नारायण सोनटक्के)
नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांनी गावाला भेट देऊन पाहणी करुन निधी देण्याचे आश्वासन दिले हेाते परंतु आजपर्यंत कोणताच निधी मिळाला नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व तालुक्यातील रहिवासी असलेल्या सौ. पदमारेड्डी सतपलवार यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख आकाशरेड्डी यांनीही गावात येवून पाहणी केली व दोन लाखाचा निधी लवकरच देऊ असे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत त्यांनीही निधी दिला नाही त्यामुळे गावातील कोणतीच विकास कामे होत नाहीत..
सौ.पोसानबाई सयाराम बोलचेटवार (सरपंच मनुर )

तालुक्यातील मौजे मनुर या गावामधील सर्वसामान्य नागरीक मुलभूत सुविधासाठी मागील चाळीस वर्षापासून संघर्ष करीत असून पुनर्वसनाच्या चाळीस वर्षानंतरही पिण्याचे पाणी, विज, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, नाली, ग्राम पंचायत कार्यालयासाठी इमारत यासारख्या मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे जगावे की मरावे असा सवाल ग्रामस्थ करीत असून याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
देश स्वतंत्र होऊन 74 वर्षे झाले असले तरी आजही असंख्य खेडोपाडी सामान्य नागरीकांना हव्या असलेल्या मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे आपण खरच स्वतंत्र झालो आहोत का? असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरीकांना पडलेला आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो परंतु ग्रामीण भाग हा आजही विकासापासून वंचीतच आहे.

धर्माबाद तालुक्यातील मनुर हे जवळपास 1000 लोकसंख्या असलेले गाव आहे. सदरील गावचे पुनर्वसन 1982 मध्ये झाले होते. पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत पुनर्वसित गावांना मिळणारा कोणताच विशेष विकास निधी या गावास मिळाला नाही. त्यामुळे गावामध्ये अंतर्गत रस्ते नाहीत. सरपंचांनी स्वखर्चातून टाकलेल्या मुरुमाच्या रस्त्यावरुन नागरीकांना ये-जा करावी लागत आहे. पावसाळयात या गावची दुर्दशा बघवत नाही. नाली बांधकाम नसल्यामुळे अनेक नागरीकांच्या घरात पाणी शिरत आहे.

तसेच या पाऊसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये साप व अन्य जीवजंतु व प्राण्यांच्या भितीने नागरीक अक्षरश: हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणूकीच्या वेळी पाच वर्षाला एकदा मते मागण्यासाठी येतात आश्वासने देऊन निघून जातात. परंतु आज पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने म्हणावे तसे सहकार्य केले नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरीकांनी प्रस्तूत प्रतिनिधीकडे बोलून दाखविल्या आहेत. जीवंतपणी तर यातना आहेतच परंतू स्मशानभूमीसाठी जागाच नसल्यामुळे मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत.

सदर गावास दलित सुधार योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून गावातील काही भागात सी.सी. रोडचे काम करण्यात आले आहे परंतू ते ही नाममात्रच. तसेच स्वजलधारा योजनेअंतर्गत पाणी पुरवठयासाठी 2013-14 या कालावधीत 22 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला होता परंतु आजवरही पाणी पुरवठयाचे काम पूर्ण झाले नाही. याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिका­याने लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरीकांना शुध्द पिण्याच्या पाण्यापासून वंचीत रहावे लागत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या