तळ्यातील चिखल -गाळ काढण्यासाठी विशेष मोहिम महापौर नरेश म्हस्केंसह ठाणे मनपाचे विशेष पथक !
[ महाड – सुशिल मोहिते ]
महाडमधील चवदार तळ्याचे ऐतिहासिकपण जपण्यासाठी शासनाच्यावतीने या तीर्थक्षेत्राची संपूर्ण स्वच्छता,तलावातील चिखल गाळ काढणे तसेच सुशोभिकरण करणे या कामाला प्राधान्य देवून चवदार तळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी जे जे करता येईल ते करणार असल्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिली.
येथील चवदार तळ्यातील चिखल व गाळ काढण्याच्या कामाची विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून त्या कामाची ना.शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे,ठाणे शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के,आमदार भरतशेठ गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा सौ.स्नेहल जगताप, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी,तउप आयुक्त अशोक बुरपल्ले आदी उपस्थित होते.
नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार आणि महापौर नरेश गणपत म्हस्के,महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेचे विशेष पथक चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहे.
पुरपरिस्थितीमधून महाड शहराला सावरण्यासाठी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे स्वत: महाडमध्ये ठाण मांडून बसले होते.ना.शिंदे यांच्या आदेशानंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेचे २०० जणांचे विशेष पथक अत्यावश्यक मशिन्ससह दोन आठवडे शहरातील स्वच्छतेसाठी कार्यरत होते.२२ जुलै रोजी आलेल्या महापुरात चवदार तळे परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले होते. चवदार तळे तसेच बाजूच्या परिसरात पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने यापूर्वी देखील पथकांमार्फत तेथील स्वच्छता करण्यात आलेली आहे.
सद्य:स्थितीत चवदारतळ्यामध्ये गाळ आणि चिखल साचला असून तो गाळ आणि चिखल पूर्णपणे काढणे आवश्यक आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा लढा ज्या चवदारतळ्यावरून सुरु केला ते चवदार तळे तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी एक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे हा परिसर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी तिथे धाव घेवून ह्या क्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याची ग्वाही दिली.
ना.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेचे विशेष पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक चवदारतळ्यातील चिखल,गाळ काढणे, पाण्याची स्वच्छता तसेच औषध फवारणी करण्याचे काम आज महापालिकेच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहे. यासाठी विविध मशिन्ससह महापालिकेचे मनुष्यबळ कार्यरत आहे.
महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या पथकांमार्फत यापूर्वीच जोरदार स्वच्छता मोहीम करण्यात आलेली आहे. महाड शहर स्वच्छ करण्यात ठाणे महापालिकेने मोलाची कामगिरी बजावली आहे.
सद्यस्थितीत चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी देखील विशेष मोहीम राबविली जात असल्याने ठाणे महापालिकेच्या या संपूर्ण कामाचे महाडवासीं,विविध संस्था,संघटना तसेच आंबेडकरी जनतेने ना. एकनाथ शिंदे,महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा आणि ठाणे महानगरपालिकेचे भरभरून कौतुक करत प्रशासनाचे आभार मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy