म्युकरमायसोशिस अर्थात ब्लॅक फंगस, बुरशीजन्य आजार !

“डॉक्टर हेमलता विद्याशंकर नेत्ररोग विशेषज्ञ”
                  9819846802
(मुलाखात, लेखन- सुरेश नंदिरे 9867600300)
गेल्या काही दिवसांपासून ब्लॅक फंगस अर्थात बुरशीजन्य आजाराला घेऊन लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ब्लॅक फंगसची अनेकांना बाधा झाली आहे. शुगर नियंत्रणात नसल्यास हा आजार आपल्या शरीरात प्रचंड वेगाने पसरतो व वेळेवर उपचार न केल्यास तो जीवघेणा ही ठरू शकतो. त्यामुळे या आजाराला घेऊन लोकांच्या मनात अनेक प्रश्न व शंका निर्माण झाल्या आहेत. चला तर मग आपल्या शंकांचे निरासन करूया.
मुळात हा आजार कसा होतो, कोणाला होऊ शकतो, त्याचे लक्षण कोणते असतात, हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे व आपक्या डॉक्टरांशी कधी संपर्क केला पाहिजे अश्या अनेक प्रश्नांवर तज्ञ डॉक्टरांची मुलाखत घेण्यात आली आहे.
तसे पाहिले तर फंगस (बुरशी) सर्व ठिकाणी असते तशी ती आपल्याला होत नाही. आपण निरोगी असल्यावर असल्या आजारांशी लढण्याची ताकद आपल्या शरीरात असते. त्यामुळे हा आजार आपल्याला होत नाही. पण आपले शरीर अशक्त झाले असेल, प्रतिकार शक्ती कमी झालेली असेल उदाहरणार्थ कोरोना झाल्यानंतर किंवा ज्यांची रक्तातील साखर (मधुमेह) अनियंत्रित राहते. अशा लोकांना हा बुरशीजन्य आजार होऊ शकतो.
■ कोणाला हा आजार होऊ शकतो – कॊरोना झालेल्या रुग्णांना स्टेरॉईड द्यावे लागते, कारण ज्यांच्या फुप्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झालेला असतो. तो संसर्ग कमी करण्यासाठी स्टेरॉईड द्यावे लागते. त्यामुळे होते काय तर स्टेरॉईड दिल्याने रक्तातील साखर वाढू शकते. ज्यांची रक्तातील साखर नियंत्रण नसेल तर अश्या लोकांची रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अशा परिस्थितीत त्यांना ब्लॅक फंगस आजार होऊ शकतो. शिवाय दीर्घकाळ एखाद्या आजारावर उपचार चालू असेल किंवा कर्करोगामुळे शरीरात अशक्तपणा आला असेल तर आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होते, तसे झाले असेल तर अशा लोकांना ही ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायसोसिस होऊ शकतो.
■ आता आपण या आजाराचे लक्षण पाहू – नजर(दृष्टी) कमी होणे, तिरळे दिसणे, पापण्या खाली पडणे, एकच वस्तू दोन वेळा दिसणे, डोळ्यातील बबूळे लाल होणे किंवा डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात काळे डाग दिसणे,
■ इतर लक्षण – डोकेदुखी, दात दुखणे किंवा हलायला लागणे, शिंका येणे किंवा नाक बंद होणे, शिंकताना नाकातून काळपट पडणे किंवा तोंडात काळे डाग दिसणे.
■ काय करायला पाहिजे – वरील कोणतेही लक्षण दिसल्यास आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा, आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधांचे घेऊ नये, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार घ्यावा, व्यायाम, योगा, मेडिटेशन करावा. लक्षात ठेवा वेळेवर उपचार केल्यास आपण आपल्या डोळ्यांना वाचवू शकतो, हा आजार प्राणघातक नसला तरी वेळेवर उपचार न केल्यास तो जीवावर बेतू शकतो. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. स्वस्थ रहा, निरोगी रहा, सतर्क रहा..
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या