कोट्यावधी रुपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरणात पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा आता न्यायालयात दाद मागणार !

[ मुंबई – सुरेश नंदीरे ]
मुंबई, दि. १६ – मानखुर्द येथील कोट्यावधी रुपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरण पोलिसांकडून अपेक्षित तपास केला जात नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चार वर्षे होत आली तरीही पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. तक्रारदारकडून आरोपींची माहिती देऊनही मुंबई पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे कोट्यावधींच्या भ्रष्टाचार प्रकरणात पोलिसच संशयाच्या पिंजऱ्यात उभे आहेत.

मानखुर्द येथील शिवशाही पुनर्वसन योजनेत स्वस्तात घरे देतो असे सांगून मधुकर कांबळे व अन्य ४० आरोपींनी सुमारे सव्वादोन हजार लोकांकडून शंभर कोटींहून अधिक रक्कम घेऊन मोठा भ्रष्टाचार केला. हे सर्व आरोपी पोलिसांसमोर मोकाट फिरत आहेत. याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात चार वर्षांपूर्वी १७०/१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सत्तरहून अधिक लोकांनी फसवणुकीच्या तक्रारी दाखल केलेल्या असतानाही पोलीस कारवाईच्या नावाखाली तक्रारदारांना खोटी माहिती देत आहेत. या प्रकरणाचा तपास अश्या पोलीस अधिकार्‍यांकडे जाणीवपूर्वक देण्यात आला होता की त्यांची वर्षभरात बदली होईल. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवासे, कदम व हुंबे या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण हातात घेतल्यानंतर वर्षभरातच त्यांची बदली करण्यात आली. या पैकी एकाही अधिकार्‍याने एकाही आरोपीला अटक केली नाही किंवा त्यांच्या बेनामी संपत्तीवर टाच आणली नाही. ज्या कार्यालयात भ्रष्टाचाराचे पुरावे ठेवण्यात आले आहेत ते कार्यालय तातडीने सील करण्यात यावे, अशी विनंती वारंवार तक्रार दाराकडून पोलिसांना करण्यात आली. मात्र पोलीस याकडे ही जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. जेणे करून पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी खुली सूट या आरोपींना दिली आहे.

गेल्या तीन वर्षात एकाही आरोपीला अटक न झाल्याने तक्रारदारांनी पावसाळी अधिवेशन काळात मोर्चा नेण्याची तयारी केली. तसे पत्र त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांना दिले. त्यानंतर मात्र पोलिसांनी आम्ही कारवाई करू तुम्ही मोर्चा नेऊ नका, अशी विनंती केली. वर्षभरात सर्व आरोपी अटक करून त्यांची बेकायदेशीर संपत्ती जप्त करू असे आश्वासन ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी दिल्यावर मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र त्यानंतरही एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.

हा तपास पूर्ण होऊ नये असे पोलिसांनी ठरवले आहे म्हणून हा तपास उपनिरीक्षक बाबर यांच्याकडे जाणीवपूर्वक देण्यात आला. ते डिटेक्शन ऑफिसर असून त्यांच्याकडे अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यांचा तपास होणे बाकी आहे. असे असताना या प्रकरणाचा तपास मुद्दामहून त्यांच्याकडे देण्यात आला. जेणेकरून तपास होऊ नये.
या प्रकरणात पोलीस तक्रारदारांची दिशाभूल करीत असून पोलिसांनी गेल्या नऊ महिन्यात तीन आरोपींना अटक केल्याचे सांगितले आहे. गोगवले, संदीप पवार व तुषार कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मात्र याबाबतची चार्जशीट जानेवारीमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सांगत आहेत. पोलिसांनी आरोपी अटक केल्यानंतर ९० दिवसांच्या कालावधीत चार्जशीट दाखल करायची असते. मात्र पोलीस नऊ महिन्यानंतर चार्जशीट दाखल करीत असल्याचे सांगत आहे. यावरून पोलिसांवरील संशय अधिक गडद होत आहे. शिवाय जे मुख्य आरोपी आहे त्यातील एकालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. तीन आरोपींना अटक करून कारवाई चालू असल्याचा देखावा पोलीस करीत आहेत, मात्र मुख्य आरोपींना पोलिसांनी हात देखील लावलेला नाही. चार वर्षात तीन आरोपींना अटक करून पोलीस काय सिद्ध करून दाखवत आहे, या प्रकरणात चाळीस हुन अधिक आरोपी असताना इतर आरोपींना अटक कधी होणार, पोलीस काय मुख्य आरोपी मधुकर कांबळे यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत का.
या प्रकरणात विशेष पोलिस पथकाची नेमणूक होत नाही तोपर्यंत हजारो लोकांना न्याय मिळणार नाही. याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयात पोलिसांच्या तपासाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला शिवाय पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे ही तक्रारी अर्ज देण्यात आले. मात्र जाणीवपूर्वक या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले.
उस्मानाबाद येथील बार्शी फटे प्रकरणात केवळ १२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून ४० लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत तरी या प्रकरणात विशेष पोलीस पथकाची नेमणूक करून तपास करण्यात येतोय. मात्र मुंबई पोलिसांना सव्वा दोन हजार लोकांची फसवणूक झालेले व शंभर कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झालेल्या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यावरून पोलिसांबाबत आता संशय निर्माण होत असून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल का असा प्रश्न निर्माण होतोय. हे सर्व प्रकरण मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावे, शिवाय ज्या पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे, अशा पोलिसांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता तक्रारदार न्यायालयात करणार आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या