आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस देणार नव्या चेहऱ्यांना संधी !

• सामाजिक व राजकीय जाण असणाऱ्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याचे आवाहन !
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील अनेक नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संधी मिळणार असून याचा फायदा नव्याने राजकीय जीवन सुरु करू पाहणारे व सामाजिक जाण जोपासणाऱ्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी केले आहे.
कुंडलवाडी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही आगामी दोन महिन्याच्या आत लागण्याची शक्यता आहे. आज पर्यंत नगरपरिषदेवर काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आदी पक्षांनी आपापले झेंडे फडकविले आहेत.
एके काळी शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 2007 ते 2012 पर्यंत नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली होती. त्यामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सुनील बेजगमवार हे दिनांक 21 फेब्रुवारी 2007 ते 20 डिसेंबर 2009 तर कै.खाजामिया मगदूमसाब हे दिनांक 21 डिसेंबर 2012 या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते.
त्यांच्यासमवेत जवळपास सात ते दहा नगरसेवक शहरातून निवडून आले होते. कालांतराने शहरातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष व नगरसेवकांनी आपल्या सोयीनुसार काँग्रेस, भाजपा व आदी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आज जरी शहरात पक्षाची थोडीफार वाताहत झाली असली तरी नव्या जोमाने पक्ष बांधणी करुन आगामी नगरपरिषद निवडणुकीत नव्या दमाच्या तरुणांना व सामाजिक जाण जोपासणाऱ्या व्यक्तींना संधी दिली जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून त्यातील प्रमुख घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे.
काही महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त नगर पंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे आगामी कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून परिवर्तन घडणार आहे. त्यामुळे राजकीय भवितव्य आजमविणाऱ्यां तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपले राजकीय भवितव्य निर्माण करून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जुडावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या