साहित्याचा केंद्रबिंदू जीवन तत्त्वज्ञान असावा ; कुंटूरच्या लोकजागर साहित्य संमेलनात संजय आवटे यांचे प्रतिपादन ! 

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे साहित्याने समाजमन घडत असते. समाज घडणीच्या कामामध्ये साहित्यिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. साहित्यिक समाजाचा एका अर्थाने वाटाड्या असतो. साहित्याचा परिघ आता बदलतो आहे. तो पुण्याहून सरकून आता आपल्या मातीकडे, गावाकडे सरकला आहे. जे जगत आहेत, तयांनी लिहिते झाले पाहिजे आणि जे लिहीत आहेत त्यांनी जगण्याचे, जीवनतत्त्वज्ञान साहित्याचा केंद्रबिंदू मानून लिहिले पाहिजे.

लिहिणार्‍यांची, साहित्यिकांची, विद्रोह्यांची व्यवस्थेला भीती वाटत असते. त्यामुळे अशी भीती, धाक व्यवस्थेवर राहील, अशी निर्मिती झाली पाहिजे, असे रोखठोक मत ज्येष्ठ विचारवंत तथा संपादक संजय आवटे यांनी कुंटूर येथील लोकजागर साहित्य संमेलनात व्यक्त केले.

कुंटूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, समीक्षक राजन गवस हे उपस्थित होते. ते संमेलन अध्यक्षपदावरून बोलताना, अक्षरांमध्ये ज्ञान असते ही चूक आहे. त्यामुळे खेड्यातील ज्ञान व्यवस्था उद्धवस्त झाली आहे. अक्षरात ज्ञान असते, असे माणणार्‍यांनी राबणार्‍या व्यक्तीला कनिष्ठ ठरवले. देशाचा घता करणार्‍यांनी अक्षरं महत्त्वाची मानली. जीवनकौशल्य ज्ञान कनिष्ठ मानलं. यामुळे खेड्यातील ज्ञान आणि संस्कृती धोक्यात आली, असे मत व्यक्त केले.
या संमेलनात डॉ. सुरेश सावंत, राजेश कुंटूरकर, विलास सिंदगीकर, धनंजय गुडसूरकर, रूपेश कुंटूरकर, सूर्यकांत पा. कदम, सूर्याजी पा. चाडकर, बालाजीराव पवार, बाबुराव आडकिने, स्वागताध्यक्ष सौ. आशाताई मारोतराव कदम यांची उपस्थिती होती. उदघाटन सत्राचे संचालन डॉ. बाळू दुगडूमवार यांनी तर आभार विनोद झुंजारे यांनी व्यक्त केले.
दुसर्‍या कथाकथन सत्रात ज्येष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत यांच्य अध्यक्षतेखाली डॉ. शंकर विभूते, वीरभद्र मिरेवाड यांचे बहारदार कथाकथन संपन्न झाले. शेवटच्या कविसंमेलन सत्रात ज्येष्ठ कवी मनोज बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली माप्न्यवर कवींचे कविसंमेलन संपन्न झाले. यात 35 कवींनी कवितावाचन केले. या कविसंमेलनाचे संचालन कवी श्रीनिवास मस्के व अशोक कुबडे यांनी केले.
रात्री लावणीसम्राट किरण कोरे व संचाच्या बहारदार लावण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी ग्रंथ व भाषाभगिनी वारीने सुरू झालेल्या या संमेलनास नायगाव तालुक्यातील साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजक राजेंद्र नालीकंठे, कार्यवाह विनोद झुंजारे, सहकार्यवाह मौलासाब शेख, कार्यकारिणी सदस्य मारोतराव कदम, गजानन आडकिने, शिवाजी आडकिने, युसूफ शेख, बालाजी कदम, विनोद जाधव, प्रल्हाद आडकिने, योगेश रेनगुंटवार, सूर्यकांत बिसमिले, प्रदीप आडकिने, दत्ता शिवनकर, बालाजी आडकिने यांच्यासह असंख्य युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या