‘प्रमोदायन’ पुस्तक हे सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या संस्कृतीचे दर्शन होय.’प्रमोदायन’ पुस्तक प्रकाशनावेळी श्रीपाल सबनीस यांचे गौरोद्गार.

[ बिलोली – सुनिल जेठे ]
प्रमोदायन’ हे केवळ एका कार्यकर्त्याचे आत्मचरित्र नसून संस्था, गाव, कुटुंब आणि देश यांच्याविषयी सामाजिक बांधिलकी जोपासून केलेलं कार्य आणि संस्कृतीचे दर्शन होय. ह्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना मला खूप आनंद झाला असून, माझे भाग्य समजतो असे गौरोद्गार अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाचे पूर्वाध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी काढले. शुक्रवार (ता.१७) रोजी नांदेड येथे ‘प्रमोदायन’ पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार, निरुपणकार विवेकजी घळसासी, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कादंबरीकार तथा मराठवाडा साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार यांच्यासह ‘प्रमोदायन’ पुस्तकाचे लेखक तथा सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृति संवर्धन मंडळ या संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, संस्थेचे विश्वस्त अरविंद देशमुख, ज्ञानसंवर्धन प्रकाशन संस्थेचे ज्ञानराज भेलोंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 
कोणतीही संस्था कार्यकर्त्यांमुळे नावारूपास येते. ‘प्रमोदायन’ ची निर्मिती, संस्थेचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्यानंतर संस्थेचे भवितव्य काय? या प्रश्नातून झालेली असली तरी संस्थेचा कार्यकर्ता हा सर्व थरातील बहुजन असून डाव्या व उजव्या किंवा दोन्ही विचारसरणीचा असल्याने तो देश, धर्म, पंथ या पलीकडचा आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रात कार्यरत असून ते संस्थेशी जोडले गेलेले असल्यामुळे त्यांचं नातं एका कुटुंबासारखं आहे, या ग्रंथातील बराचसा भाग हा माजी विद्यार्थ्यांच्या संबंधित तर आहेच. एका अनाथ विद्यार्थ्याच्या अपयशाची प्रामाणिकपणे कबुली देऊन ही पुस्तिका त्यास अर्पण केल्याने या पुस्तकाची अधिक उंची वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बाबु बिरादार यांनी प्रमोद देशमुख यांनी केलेले लिखाण हे विश्राम बेडेकरांच्या ‘एक झाड दोन पक्षी’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथातल्या दुसऱ्या पक्ष्यासारखी त्यांची भूमिका असल्याचे सांगत ‘प्रमोदायन’ पुस्तकाचे कौतुक केले.  
आपल्या अध्यक्षीय भाषणात विवेक घळसासी यांनी, सगरोळी हे संस्काराचे केंद्र असून तिथे बहुआयामी प्रयोग केले जातात. खऱ्या अर्थाने भारताचं दर्शन पाहायला मिळतं. ‘प्रमोदायन’ याचा अर्थ स्वतःभोवती फिरणे जरी असला तरी या चरित्र ग्रंथात जो विषय आहे तो संस्था आणि आपले ध्येय हा एकच असावा असे सांगून त्यांनी सदरील प्रकाशन सोहळयास शुभेच्छा देत प्रत्येकाने ‘प्रमोदायन’ वाचावे असे आवाहन केले. 
मागील चाळीस वर्षात केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा, आलेले अनुभव, यश-अपयश, सुखद व दुखद घटना, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, स्वतः व संस्था यांच्याविषयी ‘प्रमोदायन’ मध्ये लिखाण असून टाळेबंदीच्या काळात वेळ मिळाल्याने या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे प्रमोद देशमुख यांनी सांगितले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा नांदेड येथील कुसुम सभागृहात पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, साहित्यिक, माजी विद्यार्थी, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या